नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा गेल्या काही दिवसांत चांगलेच चर्चेत होते. देशात केवळ भाजपच पक्ष राहिल बाकीचे सर्वच पक्ष संपुष्टात येतील. शिवसेना तर संपत जाण्याच्या मार्गावर असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानंतर, देशभरातून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही हल्लाबोल केला होता. दुसरीकडे बिहारमध्येही सत्तापालट झालं आहे. भाजपला सर्वात मोठा पक्ष असूनही येथील सत्ता गमवावी लागली आहे. मात्र, या राजकीय गोंधळातही नड्डा हे प्रकृती स्वास्थबाबत सतर्क आहेत.
जे. पी. नड्डा यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृती उत्तम ठेवण्याच्या ध्यासाने पछाडले आहे. त्यांनी जवळपास आठ किलो वजन कमी केले असून, आणखी कमी करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानी नड्डा रोज सकाळी साधारणत: तासभर व्यायाम करतात. तसेच जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही ते व्यायाम करून घेतात. सकाळची योगासने चुकवत नाहीत. ती योग्य प्रकारे होत आहेत हे पाहण्यासाठी योग प्रशिक्षक येतो.
२०२० साली ते भाजपचे अध्यक्ष झाले तेव्हापासून ते बरेच कार्यमग्न असले तरी वयाच्या ६१ व्या वर्षी आणखी वजन वाढलेले त्यांना परवडले नसते. ‘आरोग्याकडे लक्ष द्या, नियमितपणे योगासने करा,’ असे पंतप्रधान मोदीही त्यांच्या सहकाऱ्यांना वारंवार बजावत असतात. भाजपचे अनेक खासदार दिल्लीमधल्या बागांमधून सकाळी फेरफटका मारताना त्यामुळे दिसतात.
राजद नेते तेजस्वी यादव यांनाही पंतप्रधानांनी १२ जुलैला पाटण्यात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी ‘थोडा वजन कम करो,’ असा सल्ला दिला होता. मोदी स्वत: रोज योगासने करतात. तेजस्वी यादव यांचे गेल्या वर्षी लग्न झाले. त्यानंतर त्यांचे वजन वाढलेले दिसले. परंतु पंतप्रधानांचा सल्ला त्यांनीही मनावर घेतला आहे, आता ते उपमुख्यमंत्री झाले असले तरी सकाळी तासभर आरोग्यासाठी देतात. आपल्या निवासस्थानी टेबल टेनिस खेळतात. ते स्वतः क्रिकेटपटूही आहेतच.