नवी दिल्ली: कर्नाटक काँग्रेसचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना मनीलॉन्ड्रिंग प्रकरणी उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे.
डी. के. शिवकुमार यांना बुधवारी 25 हजारांच्या जातमुचलक्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. मात्र, गेल्या सुनावणीवेळी डी. के. शिवकुमार यांना न्यायालयाने 25 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. त्यामुळे जामीन मिळाला असला तरी डी. के. शिवकुमार हे 25 ऑक्टोबरपर्यंत तिहार तुरूंगातच राहणार आहेत.
आज सकाळीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या अंबिका सोनी उपस्थित होत्या.
दरम्यान, गेल्या सप्टेंबर महिन्यात डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्या अटकेवरून कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले होते. 2017 मध्ये डी. के शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्लीतील निवासस्थानांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. या छाप्यात 8 कोटी 59 लाखांची बेकायदा रक्कम आढळून आली होती.