राजनांदगाव : जैन धर्मगुरू आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी रविवारी ‘सल्लेखना’ घेतली. आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचा जन्म १० ऑक्टोबर १९४६ रोजी शरद पौर्णिमेला बेळगाव जिल्ह्यातील सदलगा येथे विद्याधरच्या रूपाने झाला. त्यांचे वडील श्री मल्लप्पा हे नंतर मुनी मल्लीसागर झाले. त्यांच्या आई श्रीमंती या नंतर आर्यिका समयमती झाल्या.
विद्यासागरजी यांचे मोठे बंधू फक्त ग्रहस्थ आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातील सर्व सदस्यांनी संन्यास घेतला आहे. त्यांचे भाऊ अनंतनाथ आणि शांतीनाथ यांनी आचार्य विद्यासागरजी यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यांना मुनी योगसागरजी आणि मुनी समयसागरजी म्हणून ओळखले जाते.
संशोधकांनी केला कार्याचा अभ्यास
आचार्य विद्यासागरजी यांना संस्कृत, प्राकृत, हिंदी, मराठी आणि कन्नड यासह विविध आधुनिक भाषांमध्ये तज्ज्ञ प्राप्त आहे. त्यांनी हिंदी आणि संस्कृतमध्ये मोठ्या प्रमाणात रचना केल्या आहेत. शंभराहून अधिक संशोधकांनी पदव्युत्तर आणि डॉक्टरेटसाठी त्यांच्या कार्याचा अभ्यास केला आहे. निरंजना शतक, भावना शतक, परिषा जया शतक, सुनीती शतक आणि शर्मना शतक यांचा त्यात समावेश आहे.
‘मूक माटी’ ही कविताही त्यांनी रचली आहे. ती विविध संस्थांमध्ये पदव्युत्तर हिंदी अभ्यासक्रमांमध्ये शिकवली जाते. आचार्य विद्यासागरजींचे शिष्य मुनी क्षमसागरजी यांनी त्यांच्यावर ‘आत्मान्वेषी’ नावाचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद भारतीय ज्ञानपीठाने प्रकाशित केला आहे. मुनी प्रणम्यसागरजी यांनी त्यांच्या जीवनावर ‘अनासक्त महायोगी’ नावाची कविता रचली आहे.
आचार्य ज्ञानसागर यांनी दिली होती दीक्षा
विद्यासागरजी यांना ३० जून १९६८ रोजी वयाच्या २२ व्या वर्षी अजमेर येथे आचार्य शांतीसागर यांचे शिष्य आचार्य ज्ञानसागर यांनी दीक्षा दिली.
त्यांना २२ नोव्हेंबर १९७२ रोजी ज्ञानसागरजी यांनीच आचार्य पद दिले होते.
कधीही भरून न येणारे नुकसान
आचार्य विद्यासागर महाराजांच्या निधनाने देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे. लोकांमध्ये आध्यात्मिक प्रबोधनासाठी त्यांनी केलेले बहुमोल प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील चंद्रगिरी जैन मंदिरात त्यांच्याशी झालेली माझी भेट माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. ते अखेरपर्यंत गरिबी निर्मूलन, समाजात आरोग्य आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी झटले. त्यांच्या समाधीस्थ होण्याच्या वृत्ताने त्यांचे अनुयायी आणि आम्ही सारेच शोकग्रस्त झालो आहोत. माझ्यासाठी हे व्यक्तिगत नुकसान आहे. अनेक वर्षे मला वैयक्तिकपणे त्यांना भेटण्याची, त्यांचे दर्शन करण्याची आणि त्यांचे मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी मिळाली. माझ्याशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या घटनेचे २४ तासांच्या आत विश्लेषण करून ते मला संदेश पाठवायचे. इतके ते जागरूक असायचे. काही महिन्यांपूर्वीच प्रवास कार्यक्रमात बदल करून त्यांची सकाळीच भेट घेण्यासाठी आपण पोहोचलो, तेव्हा पुन्हा त्यांचे दर्शन करू शकणार नाही, हे ठाऊक नव्हते.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
विश्व कल्याणासाठी निःस्वार्थपणे कटिबद्ध राहिले
महामुनी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्यासारख्या महान व्यक्तीचे निधन हे देश आणि समाजासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. ते प्रत्येक व्यक्ती आणि विश्वाच्या कल्याणासाठी निःस्वार्थपणे कटिबद्ध राहिले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मानवतेच्या कल्याणाला प्राधान्य दिले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला अशा बुद्धिमान व्यक्तीचा सहवास, स्नेह आणि आशीर्वाद मिळाला. विद्यासागर महाराजांनी आचार्य, योगी, विचारवंत, तत्त्वज्ञ आणि समाजसेवक या सर्व भूमिकेतून समाजाला मार्गदर्शन केले.
- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
सर्व पंथ, धर्मांत आदराचे स्थान
१९९४ मध्ये जेव्हा आम्ही सकल जैन समाज संघटनेची स्थापना केली, तेव्हा आचार्य विद्यासागरजींनी आपले अनमोल आशीर्वाद दिले होते आणि सांगितले होते की, हे खूप चांगले कार्य आहे. रामटेकमध्ये त्यांच्याशी दिव्य चर्चा झाली आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी आपला प्रतिनिधीही पाठवला होता. त्यांची दृष्टी सर्वसमावेशक होती. ते जैन समाजातील सर्वोच्च आचार्यांपैकी एक होते. ते दिगंबर जैन पंथाचे असले, तरीही त्यांनी सर्व जैन पंथांमध्ये उच्च स्थान प्राप्त केले होते. त्याची तपश्चर्या अत्यंत कठोर होती. ते एक महान विद्वान होते आणि केवळ जैन समाजच नाही, तर सर्व धर्मांचे लोक त्यांच्याकडे अत्यंत आदराने आणि अत्युच्च सन्मानाने पाहतात. ते या पृथ्वीतलावर भगवंताच्या रूपाने राहत होते. त्यांचे देवलोकगमन लाखो भक्तांना असह्य आहे.
- डॉ. विजय दर्डा, अध्यक्ष, सकल जैन समाज
गतिमान ज्ञानाने छत्तीसगडसह देश आणि जगाला समृद्ध करणारे आचार्य श्री विद्यासागरजी महाराज देश आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या अनुकरणीय कार्यासाठी, त्याग आणि तपश्चर्येसाठी युगानुयुगे स्मरणात राहतील.
- विष्णुदेव साय, मुख्यमंत्री, छत्तीसगड
आचार्य पूज्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी सातत्याने सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अचौर्य, ब्रह्मचर्य यांचे अविरत आचरण करून या पंचमहाव्रतांच्या देशव्यापी प्रचारासाठी स्वतःला समर्पित केले.
- डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे नाते अतिशय जवळिकतेचे होते. गेल्या वर्षी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी ५ नोव्हेंबर रोजी आशीर्वाद घेण्यासाठी डोंगरगडला पोहोचले होते. 'आचार्य श्री १०८ विद्यासागरजींचा आशीर्वाद मिळाल्याने मी स्वत:ला धन्य समजतो, ही भेट अविस्मरणीय ठरली,' अशी भावना त्यांनी त्या वेळी व्यक्त केली होती.