मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात १० वर्षीय मुलाला 'O' पॉझिटिव्ह ऐवजी दिलं 'AB+' रक्त अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 04:37 PM2024-12-11T16:37:53+5:302024-12-11T16:40:26+5:30
एका रुग्णालयात मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे.
राजस्थानमधील जयपूर येथील एका रुग्णालयात मोठा निष्काळजीपणा पाहायला मिळाला आहे. लहान मुलांचं सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या जे.के. लोन हॉस्पिटलमध्ये किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या १० वर्षीय मुलाला चुकीच्या ब्लडग्रुपचं रक्त देण्यात आलं. मात्र, चुकीच्या ब्लडग्रुपमुळे मुलावर अद्याप कोणतीही रिएक्शन दिसून आलेली नाही.
ही बाब घरच्यांना समजताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुलाच्या अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. तपासादरम्यान सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलाची किडनी खराब झाली होती. त्यामुळे मुलाची प्रकृती खालावली. ५ डिसेंबर रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुलाला क्रिटिकल केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर ७ डिसेंबर रोजी 'O' पॉझिटिव्ह रक्त दिलं जाणार होते, मात्र O पॉझिटिव्हऐवजी AB पॉझिटिव्ह रक्त ब्लड बँकेकडून देण्यात आले. जे रक्त मुलाला चढवण्यात आलं. त्याचवेळी दोन दिवसांनी ९ डिसेंबरला पुन्हा AB पॉझिटिव्ह रक्त देण्यात आलं.
रुग्णाची फाईल समोर आल्यावर सगळा घोळ उघड झाला. मुलाची प्रकृती स्थिर असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत रुग्णालयाचे अधीक्षक कैलास मीणा यांनी समितीही स्थापन केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर चूक नेमकी कुणाची झाली हे स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.