वसुंधरांच्या विरोधात लढणार मानवेंद्र सिंह, राजस्थानात काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 05:42 PM2018-11-17T17:42:56+5:302018-11-17T17:43:09+5:30
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंचा थेट सामना झालरापाटन जागेवरून भाजपाचे माजी नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांच्याबरोबर होणार आहे.
जयपूर- राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंचा थेट सामना झालरापाटन जागेवरून भाजपाचे माजी नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांच्याबरोबर होणार आहे. मानवेंद्र सिंह यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजे यांनी झालावाड येथील सचिवालयात निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. 2003पासून वसुंधरा राजे झालरापाटन विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवून विजयी होत आहेत.
वसुंधरा राजे जेव्हा 2003मध्ये पहिल्यांदा राजस्थानातील मुख्यमंत्री झाल्या होत्या, त्यावेळी त्यांना जसवंत सिंह यांनी खूप मदत केली होती. इतकंच नव्हे, तर जसवंत सिंह यांनी राज्यात भाजपाला वाढवण्यातही मोठा हातभार लावला होता. परंतु 2014ला त्यांनी भाजपाला राम राम ठोकला आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. मानवेंद्र सिंह यांनी 14व्या लोकसभेत 2004 ते 2009मध्ये बाडमेर-जैसलमेर या जागेवरून प्रतिनिधित्व केलं होतं. 2013मध्ये ते राजस्थानच्या शीव विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडून गेले होते. परंतु 2014ला भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्यामुळे मानवेंद्र सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
2015मध्ये पुन्हा त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2018मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले. एक भूल, कमळाचं फूल, असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या एका रॅलीमध्ये पक्षप्रवेश केला होता. आता काँग्रेसनं त्यांना थेट वसुंधरा राजे यांच्या विरोधात उतरवला आहे. काँग्रेसच्या या पावलानं झालरापाटन चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळणार आहे.