श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी उडालेल्या चकमकीत जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेच्या मोस्ट वाँटेड अतिरेक्यासह तिघांचा खात्मा करण्यात आला. हा स्वयंघोषित कमांडर आयईडीतज्ज्ञ होता व मागील ३-४ चकमकींमधून बचावला होता. अखेर त्याला कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत तीन जवान जखमी झाले.कुलगाम जिल्ह्यातील नगनाद भागात काही अतिरेकी दडले असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी हा भाग सील केला व शोधसत्र सुरू केले. अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्याने घनघोर चकमकीला तोंड फुटले. जवानांनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला व तीन जवान जखमी झाले. घटनास्थळाहून एम४ अमेरिकन रायफल जप्त करण्यात आली आहे.दरम्यान, गुरुवारी कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका अतिरेक्याला यमसदनी पाठविण्यात आले होते. घटनास्थळाहून एक रायफल जप्त करण्यात आली होती.मोस्ट वाँटेड वालीद होता पाकिस्तानचा नागरिकआज ठार करण्यात आलेल्यांपैकी मोस्ट वाँटेड अतिरेक्याचे नाव वालीद होते व तो पाकिस्तानचा नागरिक होता. तो मागील दीड वर्षापासून कारवाया करीत होता. मागील ३-४ चकमकींमधून तो बचावला होता. अखेर त्याचा खात्मा करण्यात आला, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले.पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले की, आज ठार करण्यात आलेला मोस्ट वाँटेड अतिरेकी हा थेट पाकिस्तानमधून आलेल्या आदेशांचे पालन करीत होता. तेथून येणाऱ्या सूचनांनुसार, अतिरेक्यांना कारवाया करण्यास प्रवृत्त करीत होता.मागील काही दिवसांत अतिरेक्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता. चकमकीत जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जैशच्या वाँटेड अतिरेक्यासह तिघांचा चकमकीत खात्मा, स्वयंघोषित कमांडर ३-४ चकमकींमधून बचावला होता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 1:50 AM