- हरिश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पूर्ण विश्रांती घेऊन प्रकृती सुधारण्यावर लक्ष देण्यासाठी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर लागलीच मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा आहे. त्यांनी याबाबत पंतप्रधानांनाही कळविले आहे.
प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय मंत्री अरुण जेटली गेल्या तीन आठवड्यापासून प्रसिद्धीपासून दूर आहेत. कार्यालयात किंवा सार्वजनिक कार्यक्रमांनाही जात नाहीत. पक्ष प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणे पक्ष कार्यालयात जाणेही त्यांनी थांबविले आहे. भाजप अध्यक्षांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालही ते उपस्थित नव्हते.
निवासस्थानी राहून ते तातडीच्या फायली निकाली काढण्यासाठी काही मोजक्या अधिकाऱ्यांना आवश्यकता असेल तर पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटतात. प्रकृती पूर्णत: ठीक होईपर्यंत अरुण जेटली यांनी मंत्रीपदाचा राजीनामा आणि राज्यसभेतील नेतेपदही सोडण्याची इच्छा पंतप्रधानांना कळविली आहे. तथापि, पंतप्रधानांनी त्यांची विनंती फेटाळली आहे. स्वत:वर कामाचे अधिक ओझे लादून न घेता प्रकृती सुधारण्याकडे लक्ष द्यावे, यासाठी त्यांच्या कुटंबातील सदस्यही आग्रही आहेत.