जम्मू: जम्मू विमानतळावर (Jammu airbase) तैनात असलेल्या लढाऊ विमानांवर (IAF Fighter jet) आईडी बॉम्ब फेकून हल्ला करण्याचा मोठा प्रयत्न फसला आहे. जम्मू विमानतळाच्या तांत्रिक परिसरात रात्री उशिरा स्फोटाचे आवाज ऐकू आले होते. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. ड्रोनद्वारे हा हल्ला (Drone attack) करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, आयईडी इमारतीवर कोसळल्याने दहशतवाद्यांचा हा हल्ला फसला आहे. (Use of Drones in Jammu Airport Blasts Points to Pakistan Role)
रात्री २ च्या सुमारास जम्मू विमानतळ परिसरात स्फोटांचे दोन आवाज ऐकू आले. स्फोटाचा आवाज बऱ्याच अंतरापर्यंत ऐकू गेला होता. स्फोट झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर जम्मूतील मुख्य विमानतळ आणि भारतीय हवाई दलाचं स्टेशन हेडक्वॉर्टर आहे. त्यामुळे हा भाग संवेदनशील समजला जातो. रात्री उशिरा स्फोट होताच आसपासच्या परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
हवाईदलाने पहिला स्फोट इमारतीच्या छतावर तर दुसरा स्फोट जमीनीवर झाल्याचे स्पष्ट केले आहे. या हल्ल्यात इमारतीच्या छताला भोक पडले आहे. स्लॅबच्या छताला भोकपडण्याएवढी या स्फोटकांची तीव्रता होती.
सुत्रांनुसार, पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कारण हा लष्करी विमानतळ सीमेपासून केवळ १४ किमी अंतरावर आहे. ड्रोनद्वारे १२ किमीपर्यंत स्फोटके फेकता येतात. ही स्फोटके टाकण्यासाठी दोन ड्रोन वापरण्यात आले आहेत. कारण हे स्फोटके लादलेले ड्रोन रडारच्या निशान्यावर येत नाहीत. यामुळे अशा हल्ल्यांसाठी वजन वाहून नेणारे ड्रोन वापरले जातात. या आधीही असे प्रकार करण्यात आले आहेत.
हा हल्ला भारतीय हवाई दलाची विमानतळावर तैनात असलेली लढाऊ विमाने नष्ट करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र, त्यांचा निशाना चुकल्याने विमानांना कोणतेही नुकसान झालेले नाहीय, असेही सुत्रांनी सांगितले. सध्यातरी ड्रोन हल्ल्याची अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी देखील हवाई दलाची फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. तसेच एअर मार्शल विक्रम सिंह देखील हवाई तळावर जाणार आहेत.