श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 7 वर्षांच्या इतिहासात 2017मध्ये पहिल्यांदाच दहशतवाद विरोधी मोहिमेत 200 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या या संयुक्त कारवाईत यंदाच्या वर्षांत 200 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काश्मीरमधल्या बडगाम आणि बारामुल्ला या जिल्ह्यांतल्या दोन वेगवेगळ्या घटनेत लष्कराच्या सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून पोलीस महासंचालकांनी ही माहिती दिली आहे.एकीकडे दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी आणि हल्ले करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतानाच लष्करही पूर्ण सामर्थ्याने त्यांना चोख प्रत्युत्तर देत असते. त्यातच दहशतवादी गटांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार काश्मीरमध्ये वावर असलेल्या बड्या दहशतवाद्यांना पद्धतशीररीत्या टिपण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणारा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी बशीर लष्करी तसेच हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सब्जार अहमद भट्ट यांचाही ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे.लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दहशतवाद्यांसोबतच्या सर्वाधिक चकमकी या दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियाँन आणि अनंतनाग जिल्ह्यात झाल्या आहेत. तर उर्वरित चकमकी या उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यात आणि मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये 11 महिन्यांत लष्करानं 200 दहशतवाद्यांचा केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 5:18 PM