जम्मू-काश्मीरमधला जिल्हा कोरोनामुक्त; मराठी आयएएस अधिकाऱ्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 12:41 PM2020-04-06T12:41:43+5:302020-04-06T12:49:58+5:30

जनता कर्फ्यूपूर्वीच आठवडा केली होती जिल्ह्यात नाकाबंदी

Jammu and Kashmir district free from corona ; Prime Minister's Office also appreciated the Marathi IAS officer | जम्मू-काश्मीरमधला जिल्हा कोरोनामुक्त; मराठी आयएएस अधिकाऱ्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कौतुक 

जम्मू-काश्मीरमधला जिल्हा कोरोनामुक्त; मराठी आयएएस अधिकाऱ्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कौतुक 

Next
ठळक मुद्देचीनला लागून असल्याने ‘डोडा’ जिल्ह्याची बॉर्डर त्वरित सील केली  प्रत्येकाची नित्याने वैद्यकीय तपासणी करून प्रत्येकाची स्वतंत्र नोंद

नीलेश राऊत - 
पुणे : कोरोना विषाणूच्या विळख्यात संपूर्ण जग अडकत चालले असताना, जम्मू काश्मीरमधील ‘डोडा’ जिल्ह्यात मात्र कोरोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही़  कोरोना विषाणूची चाहूल लागताच योग्य खबरदारी व उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्यानेच, पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या व पर्यटकांसह आसपासच्या जिल्ह्यातील तथा राज्यातील नागरिकांची रोजगारासाठी वर्दळ असलेला ‘डोडा’ जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यास यश आले आहे़ ‘डोडा’चे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या पुण्यातील सागर डोईफोडे यांनी ही कामगिरी करून दाखविली आहे. त्यांच्या या कार्याचे पंतप्रधान कार्यालयानेही कौतुक केले असून, डोईफोडे यांचा ‘डोडा’ पॅटर्न हा अनेकांना पथदर्शी बनला आहे.


भारताच्या उत्तरेला असलेल्या या जिल्ह्याला आसपासच्या देशात विशेषत: चीनमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाचा सर्वाधिक धोका होता.  त्यामुळे ‘डोडा’ जिल्हा प्रशासकीय यंत्रणा जनता कर्फ्यूपूर्वीच कामाला लागली होती. डोंगरी भाग व नेहमीच थंड परिसर, थंड हवामानात या कोरोना विषाणूचा प्रसार अधिकच. यामुळेच जिल्हा प्रशासनाने खबरदारीत कुठलीही काटकसर केली नाही़.  लॉकडाऊनच्या दहा दिवसांपूर्वीच या जिल्ह्याच्या बॉर्डर सील केल्या होत्या.  जो कोणी जिल्ह्यात आला किंवा येत होता़  त्याची आरोग्य तपासणी करून त्याला लागलीच क्वारंटाइन करत होते. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर दोनच दिवसांत देशात लॉकडाऊन पुकारला गेला व येथील प्रशासकीय यंत्रणा अधिकच कार्यरत झाली़. 
होम क्वारंटाइन केलेल्या सर्व नागरिकांना घरपोच किराणा व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन तयार करून घरबसल्या त्यांच्या सर्व गरजांची पूर्तता केली. याचबरोबर बाहेर जिल्ह्यातील तथा चिनापच्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना, मजूरांनाही जिल्ह्याबाहेर पडू दिले गेले नाही. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सुविधा पुरविण्यासाठी ‘डिस्ट्रिक्ट किचन’ ही संकल्पना राबवून दररोज पाच ते सहा हजार जणांची जेवणाची सोय केली गेली आहे. 
लॉकडाऊनच्या याच काळात जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचापासून ते शहरातील सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी सागर डोईफोडे यांनी कार्यास सुरुवात केली.  
देशभरात मास्कचा तुटवडा भासत असतानाच या जिल्ह्यात मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून मास्क आणण्याची गरज पडली नाही. हे मास्कही स्थानिकांकडून करून घेतले. त्यांना घराबाहेर पडू न देता जिल्हा प्रशासकीय यंत्रणांनी ते जमा केले. यामाध्यमातून १ लाख मास्क स्थानिकांना दाम अदा करून मिळविले गेले़ तर दुसरीकडे १० हजार प्रशासकीय सेवकांना वैद्यकीय किटही जिल्ह्यातच तयार केले.
............
चीनला लागून असल्याने ‘डोडा’ जिल्ह्याची बॉर्डर त्वरित सील केली 
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील लाकडी लिंबोडी येथे जन्म झालेले व पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी व डी. वाय. पाटील कॉलेज येथे शिक्षण घेतलेल्या सागर डोईफोडे यांनी ‘डोडा’ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून फेब्रुवारी, २०१९ मध्ये कार्यभार स्वीकारला. नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व अन्य यंत्रणांनाबरोबर घेऊन डोईफोडे यांचे कार्य सध्या चालू आहे.  त्यांचे कुटुंबीय पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहण्यास असून, गरोदर पत्नीकडून येत्या दोन-तीन दिवसात आनंदवार्ता प्राप्त होणार आहे.  परंतु आपल्या होणाऱ्या बाळाचे मुख पाहण्याचा मोह बाजूला ठेवून त्यांनी डोडा जिल्ह्यातील सेवेस प्राधान्य दिले आहे. ‘डोडा’ जिल्हाला लागून चीनची बॉर्डर असल्याने त्या त्वरित सील केल्या.
........
पुणे शहरातील ३ जणांचाही पाहुणचार
फिल्म शूटिंगच्या कामासाठी पुण्यातील तीन जण २१ मार्च रोजी डोडामध्ये पोहचले होते. या सर्वांना जनता कर्फ्यूनंतर जिल्हा प्रशासनाने जाऊ दिले नाही़  या सर्वांना येथेच एका कुटुंबामध्ये निवारा देऊन त्यांचा पाहुणचार जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे़
..........
तबलीकी जमातीच्या कार्यक्रमात गेलेल्यांचाही शोध
दिल्ली येथील तबलीकी जमातीच्या कार्यक्रमाला गेलेल्या ३७ जणांना शोधून या सर्वांना खबरदारी म्हणून यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात क्वारंटाइन केले आहे.  या व्यतिरिक्त बाहेरून आलेल्या प्रत्येकास येथे क्वारंटाइन केले असून, ही संख्या आजमितीला १ हजार ९६३ इतकी आहे.  यातील प्रत्येकाची नित्याने वैद्यकीय तपासणी करून प्रत्येकाची स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. 

Web Title: Jammu and Kashmir district free from corona ; Prime Minister's Office also appreciated the Marathi IAS officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.