जम्मू-काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:51 AM2019-03-04T04:51:54+5:302019-03-04T04:52:03+5:30
जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले. आॅर्गनायझेशन आॅफ इस्लामिक को-आॅपरेशनने (ओआयसी) जम्मू आणि काश्मीरवर केलेल्या ठरावावर रवीश कुमार शनिवारी बोलत होते.
जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील ठरावांबद्दल बोलायचे तर आमची भूमिका सुसंगत व चांगली परिचित आहे. ५७ देश सदस्य असलेल्या ओआयसीने काश्मीरवर संमत केलेल्या ठरावात भारतावर कठोरपणे टीका करण्यात आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
तत्पूर्वी, ओआयसीने जम्मू आणि काश्मीरमध्ये जुलै २०१६ पासून अत्याचार वाढल्याचे, अंतर्गत दहशतवाद वाढल्याचे, बेकायदेशीरपणे स्थानबद्ध करून ठेवण्याचे प्रमाण वाढल्याची जोरदार टीका केली होती.
भारतावर ओआयसीने काश्मीरवरून टीका करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारताच्या हवाई दलाचा विमान पायलट अभिनंदन वर्धमान यांना परत पाठविल्याबद्दल प्रशंसा केली होती.
ओआयसीने काश्मीरवर केलेल्या ठरावावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी टीका
केली.
ओआयसीने भारताला खुल्या अधिवेशनासाठी बोलावल्याबद्दल मोदी हे भारताचे मुत्सद्देगिरीचे यश असल्याचे सांगत होते, पण काश्मीर प्रश्नावर याच अधिवेशनाने पाकिस्तानला पाठिंबा देणारा ठराव करणे हे प्रचंड अस्वस्थ करणारे आहे, असे पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटले.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अबुधाबीत झालेल्या अधिवेशनाला गेल्या होत्या. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी म्हटले की, काश्मीर प्रश्नावर ओआयसीने पाकिस्तानला पाठिंबा देणारा ठराव संमत केला आहे. या ठरावात ओआयसीच्या सदस्य देशांनी पुन्हा म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीर हा पाकिस्तान व भारत यांच्यातील वादाचा महत्त्वाचा मुद्दा असून, दक्षिण आशियात शांतता असावी या स्वप्नासाठी या अधिवेशनाचा ठराव अपरिहार्य आहे. तिवारी म्हणाले की, हा ठराव म्हणजे मुत्सद्देगिरीचे यश आहे का हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना काँग्रेस विचारू इच्छितो.