श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तसेच जवानांनी एक AK-47 आणि पिस्तूल देखील जप्त केली आहे. याचबरोबर संबंधित परिसरात जवांनाकडून शोधमोहीम राबवली जात असल्याची देखील माहिती समोर आली आहे. शुक्रवारी जम्मूतील राजौरीमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं होतं. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील मोचवा परिसरामध्ये शनिवारी (7 ऑगस्ट) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
जैश ए मोहम्मदचा टॉपचा दहशतवादी अबू सैफुल्लाचा काही दिवसांपूर्वी खात्मा करण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. दहशतवादी संघटना जैशशी संबंधित दहशतवादी चकमकीत मारला गेला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू सैफुल्ला हा अदनान, इस्माईल आणि लंबू या नावानेही ओळखला जातो, 2017 पासून घाटीत सक्रिय होता, तो पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील हंगलमार्ग येथे झालेल्या चकमकीदरम्यान देखील त्याचा सहभाग होता.
पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा
अबू सैफुल्ला हा मसूद अजहरच्या अगदी जवळचा होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की तो 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासह इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. दहशतवादी अदनान हा पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेतील रऊफ अजहर, मौलाना मसूद अजहर आणि अम्मार यांचा मजबूत सहकारी होता. तो वाहनांद्वारे चालवल्या जाणाऱ्या आयईडीमध्ये तज्ञ होता, ज्याचा वापर अफगाणिस्तानमध्ये नियमितपणे केला जातो आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यातही याचा वापर केला गेला होता, ज्यामध्ये सुमारे 40 भारतीय सैनिक शहीद झाले होते.