Jammu and Kashmir: कलम 370 रद्द होताच पाकिस्तान बरळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:34 PM2019-08-05T15:34:04+5:302019-08-05T16:39:55+5:30
मोदी सरकारने काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याबाबतची, त्यातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. यावरून देशभरात राजकीय पक्षांकडून टीकेची झोड उठलेली असताना पाकिस्तानही खवळला आहे. पाकिस्ताननेभारताला थेट धमकीच देऊन टाकली आहे.
मोदी सरकारने काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावरून देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या एकीकडे आनंद व्यक्त होत असताना मोदींचा बिहारमधील मित्रपक्ष जदयूने टीका केली आहे. तसेच काँग्रेस, राजदनेही विरोध केला आहे.
या निर्णयावरून एकीकडे भारतातील शेअरबाजार कोसळलेला असताना पाकिस्तानचा शेअरबाजारही कोसळला आहे. तसेच काश्मीरला ताब्यात घेऊ पाहणाऱ्या पाकिस्तानच्याही पायाची आग मस्तकात गेली आहे. आधीच पाकिस्तान कुलभूषण यादव यांच्या बाबतची केस हरलेला असताना त्याने भारताला काश्मीरमुद्द्यावर धमकी दिली आहे.
Pakistan Ministry of Foreign Affairs statement on Article 370: As the party to this international dispute, Pakistan will exercise all possible options to counter the illegal steps. Pakistan reaffirms its abiding commitment to the Kashmir cause.
— ANI (@ANI) August 5, 2019
काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. यामुळे एक पक्ष होण्याच्या नात्याने पाकिस्तान या बेकायदेशीर निर्णयाविरोधात आवश्यक पाऊले उचलेल. पाकिस्तान काश्मीरच्या बाबतीत आपली प्रतिबद्धता जपेल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी भारतावर टीका करताना इशारा दिला आहे. भारताने खूपच खतरनाक खेळ खेळला आहे. याचे उपखंडावर गंभीर परिणाम होणार आहेत. पाकचे पंतप्रधान इम्रान खान काश्मीर प्रश्नाला सोडवण्याकडे घेऊन जाण्यास इच्छुक आहेत. तर भारत हा प्रश्न आणखी चिघळवत आहे. आता काश्मिरींवर पहिल्यापेक्षा जास्त पाहारा ठेवण्यात आला आहे. आम्ही याबाबत संयुक्त राष्ट्राला कळविले आहे. तसेच इस्लामिक देशांनाही याबाबच सांगितले आहे.
कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचं देशभरात स्वागत होतंय. कारण हे कलम हटवल्यानं सात महत्त्वपूर्ण बदल अंमलात येणार आहेत. त्यावर एक दृष्टिक्षेप...
१. जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नसल्यानं दुहेरी नागरिकत्वाचा विषय संपुष्टात येईल.
२. जम्मू-काश्मीरबाबत कुठलाही नवा कायदा करण्यासाठी आता राज्य सरकारच्या संमतीची गरज नसेल.
३. राज्य सरकारच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकेल.
४. अन्य राज्यातील नागरिकांना आता जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करता येईल, गुंतवणूक करता येईल.
५. जम्मू-काश्मीर पोलीस केंद्र सरकारच्या, केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारित येतील.
६. जम्मू-काश्मीर राज्याचा स्वतंत्र झेंडा होता. तो आता नसेल.
७. राज्यावर आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा अधिकार मिळेल.