जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र सरकारने आज जाहीर केला. जम्मू-काश्मीर दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यासंबंधीचं विधेयकही राज्यसभेत मंजूर झालं. या निर्णयाचं स्वागत कुणी लाडू-पेढे वाटून करतंय, तर कुणी बॅनर-होर्डिंग लावून करतंय. परंतु, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काव्यरूपी पुष्पमाला घातली.
कलम ३७० रद्द करण्याच्या शिफारशीवर राज्यसभेत दिवसभर चर्चा झाली. त्यावेळी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका मांडली. या चर्चेदरम्यान रामदास आठवलेंच्या कवितेनं रंगत आणली.
'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल, अब आतंकवाद हो जाएगा निल, इसलिए मुझे अच्छा हो रहा है फील'
'आज का दिन नहीं है काला, इसलिए मैं नरेंद्र मोदी और अमित शाह को पहनाता हूं माला'
'अलगाववादियों के मुंह पर लग जाएगा अब ताला और आतंकवाद का साफ हो जाएगा नाला भारत जिंदाबाद का गूंज जाएगा अब वहां नारा और जाग जाएगा जम्मू-कश्मीर सारा'
'नरेंद्र मोदी सरकार ने 370 कानून को हटा दिया है और अमित शाह ने कांग्रेस वालों को कुछ टाइम तक वेल में बिठा दिया है'
'भारत के लोगों की जो भावना थी उसको हमने मिटा दिया है पाकिस्तान जिंदाबाद बोलने वालों का नाम मिटा दिया है'
काश्मीर हे आमच्या देशाचं शिर आहे. हे शिर कापण्यासाठी पाकिस्तानने अनेक कुटील डाव रचले. या पार्श्वभूमीवर, सरकारचं हे धाडसी पाऊल दहशतवाद संपवण्याचं काम करेल. दहशतवाद्यांना जेरबंद करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेला धरूनच ही शिफारस करण्यात आली आहे, असं रामदास आठवले म्हणाले. गुलाम नबी आझाद यांच्या नावातच आझाद आहे आणि या विधेयकाद्वारे आम्ही काश्मीर आझादच करत आहोत. ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काश्मीरचं हित पाहून या विधेयकाला पाठिंबा द्यायला हवा, असा टोलाही त्यांनी मारला.