नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय सैन्याला मोठं यश मिळालं आहे. जैश ए मोहम्मदचा टॉपचा दहशतवादी अबू सैफुल्लाचा खात्मा करण्यात आला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. दहशतवादी संघटना जैशशी संबंधित दहशतवादी आजच्या चकमकीत मारला गेला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू सैफुल्ला हा अदनान, इस्माईल आणि लंबू या नावानेही ओळखला जातो, 2017 पासून घाटीत सक्रिय होता, तो पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील हंगलमार्ग येथे झालेल्या चकमकीदरम्यान देखील त्याचा सहभाग होता.
अबू सैफुल्ला हा मसूद अजहरच्या अगदी जवळचा होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की तो 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासह इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. दहशतवादी अदनान हा पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेतील रऊफ अजहर, मौलाना मसूद अजहर आणि अम्मार यांचा मजबूत सहकारी होता. तो वाहनांद्वारे चालवल्या जाणाऱ्या आयईडीमध्ये तज्ञ होता, ज्याचा वापर अफगाणिस्तानमध्ये नियमितपणे केला जातो आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यातही याचा वापर केला गेला होता, ज्यामध्ये सुमारे 40 भारतीय सैनिक शहीद झाले होते.
अधिकाऱ्यांनी अबू सैफुल्लाचा तालिबानशीही संबंध असल्याचं सांगितलं. जैश संघटनेची पुन्हा स्थापना करण्यासाठी आणि बळकटी आणण्यासाठी त्याचा प्रयत्न केला गेला तसेच अवंतीपोरा, विशेषत: पुलवामाच्या काकापोरा आणि पंपोर भागात नवीन दहशतवादी गटांची भरती करण्यासाठी आणि हल्ले करण्यासाठी त्यांचा वापर केला. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.
खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एक एम -4 रायफल, एके -47 रायफल, एक ग्लॉक पिस्तूल आणि आणखी एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सुरक्षा दलांनी आज सकाळी संयुक्त कारवाई केली आणि घेराव आणि शोध मोहिमेदरम्यान गोळीबार केला, ज्यामध्ये दोन्ही दहशतवादी ठार झाले. या वर्षी जानेवारीपासून सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये काही टॉप कमांडरसह जवळपास 87 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे अशी माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.