Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 08:01 AM2019-09-03T08:01:57+5:302019-09-03T08:05:18+5:30
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सुरक्षा दल असे प्रयत्न हाणून पाडत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात जवानांना यश आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पाकिस्तानी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान त्यांना अटक करण्यात यश आले आहे. सध्या या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच 300 ते 350 अतिरेकी काश्मिरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गुप्तचर एजन्सी आणि सुरक्षा दलाने म्हटले आहे. तर गेल्या दोन आठवड्यांत 40 ते 50 अतिरेकी घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
काश्मीरमध्ये आठ महिन्यांत 139 दहशतवाद्यांचा खात्मा
यंदाच्या वर्षी 1 जानेवारीपासून ते 29 ऑगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने 139 दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षात तसेच काश्मीरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाले आहेत.
गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत 26 जवान शहीद झाले. त्यातील सर्वाधिक मृत्यू फेब्रुवारीत झाले. त्या महिन्यात आठ जवान शहीद झाले होते. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, ऑगस्ट महिन्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तर एकाला जिवंत पकडण्यात आले. मे महिन्यामध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत 27 दहशतवादी ठार झाले. यंदाच्या अन्य महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झालेला नाही. मे महिन्यात 22 दहशतवादी कारवाया घडल्या. यंदाच्या अन्य महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.
शस्त्रसंधीचे उल्लंघन
5 ऑगस्टनंतर ते 29 ऑगस्टपर्यंत सीमेवर पाकिस्तानने 222 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याआधी जुलै महिन्यांत पाकिस्तानने 296 वेळा असे प्रकार केले होते. गेल्या आठ महिन्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 1899 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून असे प्रकार गेल्या वर्षी याच कालावधीत 1889 वेळा घडले होते.