श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतीय जवानही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. रविवारी (23 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला आहे. तर सोमवारी आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. आतापर्यंत गेल्या 24 तासात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कुपवाडा येथील चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला आहे.
कुपवाडा सेक्टरमधील तंगधार येथे रविवारी सीमेपलीकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. सोमवारी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. रविवारपासून आत्तापर्यंत या भागात सैन्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परिसरात दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरू आहे.