जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. दरम्यान, आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले आहेत, तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी बारामुल्लीतल्या क्रेझरी भागात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक अधिकारी आणि सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले. सर्च ऑपरेशन दरम्यान आधीच एक दहशतवादी ठार झाला होता. त्यानंतर बारामुल्ला येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आली. या चकमकीत सुरक्षा दलाने आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून एक एके 47 रायफल, 2 पिस्तूल जप्त केली आहे. तर अद्याप तिसर्या दहशतवाद्याचा शोध घेण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
दरम्यान, या चकमकीसंदर्भात जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी माहिती दिली. ते म्हणाले, " बारामुल्लीतल्या क्रेझरी भागात सुरू असलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये उत्तर काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी सज्जादचा खात्मा करण्यात आला. तर आणखी एक दहशतवादी अनतुला मीर यालाही ठार करण्यात आले."
याआधी शुक्रवारी देखील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य केले होते. श्रीनगरच्या बाहेर असलेल्या नौगाम बायपासजवळ दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना वीरमरण आले. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये सातत्याने जवान आणि पोलीस पथकांवर दहशतवादी हल्ले होत आहेत. दोन दिवसांपूर्वी बारामुल्लातल्या सोपोरमध्ये लष्कराच्या तुकडीवर हल्ला झाला होता. त्यात एक जवान जखमी झाला होता.