श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सोमवारी (24 सप्टेंबर) संध्याकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, सोपोरमध्ये दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच, जवानांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.
चकमक सुरू झाल्यानंतर सोपोर आणि आसपासच्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारे मदत मिळू नये, यासाठी जवानांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली. तर दुसरीकडे जम्मू काश्मीमधील बडगाव येथील पकेरपोरा गावातही दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातही जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
(पुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक? लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...)
(24 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा)दरम्यान, रविवारी (23 सप्टेंबर) जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला तर सोमवारी (24 सप्टेंबर) आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. आतापर्यंत गेल्या 24 तासात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दरम्यान, कुपवाडातील चकमकीत एक जवान शहीद झाला आहे.
कुपवाडा सेक्टरमधील तंगधार येथे रविवारी सीमेपलीकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. सोमवारी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. रविवारपासून आतापर्यंत या भागात सैन्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परिसरात दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरू आहे.