श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान, आपले दोन जवान चकमकीत जखमी झाले आहेत. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील लर्रू परिसरात चकमक सुरू होती. येथील एका घरामध्ये चार ते पाच दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तातडीनं परिसराला चारही बाजूंनी घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. यावेळेस दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू होता. या गोळीबारादरम्यानच दोन जवान जखमी झाले. त्यांना तातडीनं स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात वाहनांना परवानगी नाकारण्यात आली होती.
डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमक संपली असून यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.