नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली आहे. मोदी सरकारनं कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरमधल्या जनतेची फसवणूक केली आहे. 1947ला जम्मू-काश्मीरला ज्या विश्वासावर भारताशी जोडला गेला होता, तो आता संपुष्टात आला आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचे भयंकर दुष्परिणाम समोर येतील.कलम 370 हटवण्यासाठी भारत सरकारनं फसवणुकीच्या मार्गांचा वापर केला आहे. मोदी सरकार काहीही मोठं करणार नसल्याचं सांगत आमच्याशी खोटं बोललं. हा निर्णय काश्मीरला छावणीच स्वरूप आणल्यानंतर लागू करण्यात आला आहे. लोकांचा आवाज दाबण्यासाठी पूर्ण राज्यांत लाखो शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले होते. कलम 370 आणि 35 ए हटवणं घटनाबाह्य आहे. लोकशाहीच्या माध्यमातून हे कलम हटवण्यात आलेलं नाही. आम्ही या मुद्द्यासाठी मोठी लढाई लढू, असंही ते म्हणाले आहेत.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी याचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. कलम 370 हटवण्याचा निर्णय हा अवैध आणि असंवैधानिक आहे' असं ट्वीट मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे. तसेच भारताने काश्मीरबद्दल दिलेला शब्द पाळला नाही. काश्मीरच्या जनतेला दहशतीखाली ठेवून भारताला हा प्रदेश हवा आहे असंही मुफ्ती यांनी म्हटलं आहे.