श्रीगर: जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) च्या बारामूला जिल्ह्यातील सोपोरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशताद्यांमध्ये रात्रभर चकमक झाली. त्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बुधवापासून सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केले होते.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सुरक्षा दलाने परिसरात नाकाबंदी करुन प्रत्येक घराची झाडाझडती सुरू केली. यादरम्यान त्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासही सांगितले. पण, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सैन्यालाही गोळीबार सुरू करावा लागला. रात्रभर ही चकमक चालली, यात दोन दहशतवादी ठार झाले. दरम्यान, सुरक्षा दलातील सर्व जवान सुखरुप आहेत.
या चकमकीनंतर काश्मीर पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी यशस्वी अभियानासाठी सुरक्षा दलाचे अभिनंदन केले. काश्मीर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सांगण्यात आले की, ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक फयाज वार होता. त्याचा सुरक्षा दल आणि सामान्य नागरिकांवर झालेल्या अनेक हल्ल्यात सहभाग होता. तसेच, उत्तर काश्मीरमध्ये झालेल्या हिंसेसही तो जबाबदार होता. दरम्यान, भारतीय सैन्याने यावर्षी आतापर्यंत 80 दहशतवाद्यांना कंठस्नान झातले आहे.