Jammu Kashmir: पुलवामा येथे २ दहशतवाद्यांचा खात्मा; हंदवाडामध्ये घरात लपलेल्या अतिरेक्यांना जवानांनी घेरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 11:34 PM2020-05-02T23:34:46+5:302020-05-02T23:35:06+5:30
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील दंगेरपुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनी आज पहाटे परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. अद्याप दोघांची ओळख पटली नाही. कुपवाडा येथे सुरक्षा जवानांशी अद्यापही चकमक सुरू आहे. दहशतवादी लपलेल्या घरात लष्कराचे २ अधिकारी, एक सैनिक आणि जम्मू-काश्मीर पोलीस दाखल झाले आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील दंगेरपुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनी आज पहाटे परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा जवानांची या भागात शोध मोहीम चालू असताना तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मारलेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दरम्यान, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे सुरक्षा जवानांसोबत आणखी एक चकमक सुरु झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा जवानांनी शुक्रवारी हंदवाडाच्या चंजमुल्ला भागात शोधमोहीम सुरू केली. शनिवारी सायंकाळी दहशतवाद्यांशी चकमक झाली. संपूर्ण परिसराला जवानांनी घेरलं आहे आणि अजूनही चकमक चालू आहे. ताज्या माहितीनुसार दहशतवादी एका घरात लपले आहेत.