नवी दिल्ली - एकविसाव्या शतकात माणसाने खूप प्रगती केली. पण तरीही आज समाजात अंधश्रद्धेची मुळे खोलवर रुजलेली पाहायला मिळत आहेत. बिहारच्या जमुईमध्ये अंधश्रद्धेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर तासनतास त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. बिहार राज्याच्या जमुई शहरातील लगमा परिसरात ही घटना घडली. गावातील मां काली परिसराच्या भाविक जेथे थांबतात तिथे शेडमध्ये तरुणाचा मृतदेह ठेवून ग्रामस्थ व त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय विपिन कुमार रावत यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. सोमवारी सकाळी विपीन हे त्यांच्या लहान भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीत जाण्याच्या तयारीत होते. जनरेटरची तारेतून शॉक लागल्याने ते बेशुद्ध झाले. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
विपिन यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणला असता त्यांच्या हृदयाचे ठोके अजूनही सुरूच असल्याचे कुटुंबीयांना वाटले. हे ऐकल्यानंतर तिथे लोकांची गर्दी झाली. यानंतर त्यांचा मृतदेह काली मंदिर परिसरातील यात्री शेडमध्ये ठेवण्यात आला. स्थानिकांनी मृतदेहावर राख आणि लाटणे फिरवले. हा धक्कादायक प्रकार अनेक तास चालत राहिला. मात्र, विपिन यांच्या निर्जीव शरीरात जीव आला नाही. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.
मृताचे नातेवाईक विनोद कुमार रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना विश्वास होता की विपिन जिवंत असेल, त्यामुळे आम्ही त्याला वीजेचा शॉक लागल्यानंतर घरगुती उपचार करत होतो. मात्र, रुग्णालयाच्या डॉक्टरांनी विपिन यांना मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.