बुलेट ट्रेनसाठी जपानच्या सहकार्यामुळे चीनला झोंबल्या मिरच्या, दिली नवी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 07:11 PM2017-09-13T19:11:55+5:302017-09-13T19:12:03+5:30
जपानचे पंतप्रधान भारताच्या दौ-यावर असून, उद्या बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळाही त्यांच्याच हस्ते पार पडणार आहे. नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे हे दोन्ही नेते बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ करणार आहेत. परंतु या आनंदाच्या वातावरणातही चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. चीननं त्याच वेळी भारताला नवी ऑफर दिली आहे.
नवी दिल्ली, दि. 13 - जपानचे पंतप्रधान भारताच्या दौ-यावर असून, उद्या बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळाही त्यांच्याच हस्ते पार पडणार आहे. नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे हे दोन्ही नेते बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ करणार आहेत. परंतु या आनंदाच्या वातावरणातही चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. चीननं त्याच वेळी भारताला नवी ऑफर दिली आहे.
भारताच्या हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी आम्ही भारताला मदत करू इच्छितो, असं विधान चीननं जारी केलं आहे. विशेष म्हणजे चीननं यापूर्वीसुद्धा भारताला बुलेट ट्रेनच्या मदतीसाठी ऑफर दिली होती. त्यावेळी भारताकडून चीनला डावलण्यात आलं आणि जपानसोबत बुलेट ट्रेन बनवण्यासाठी करार करण्यात आला. मात्र चीनकडून दुस-यांदा आलेल्या ऑफरवर भारतानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अहमदाबाद-मुंबईदरम्यान तयार होत असलेल्या बुलेट ट्रेनसंबंधित विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीन म्हणाला, भारतामध्ये अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी सहयोग करण्यास आम्ही तयार आहोत.
भारतासोबत या क्षेत्रात सहयोग वाढवण्यासाठी आम्ही तयार असल्याचंही चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले आहेत. तसेच चीननं भारतातल्या चेन्नई-नवी दिल्ली आणि नवी दिल्ली-नागपूरदरम्यानच्या हाय स्पीड ट्रेनच्या संभावित प्रोजेक्टचाही अभ्यास केला आहे, असंही ते म्हणाले आहेत. हाय स्पीड ट्रेन प्रोजेक्टच्या माध्यमातून चीन आणि भारताच्या भूमिका महत्त्वपूर्णरीत्या वाढत आहेत. शुआंग म्हणाले, दोन्ही देशांचे संबंधित प्राधिकरण यासाठी एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही देशांमध्ये एचएसआर प्रोजेक्टच्या अभ्यासावरही सहमती झाली आहे. लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. जपान आणि चीन हाय स्पीड रेल टेक्नॉलॉजी निर्यात करणारे जगातील दोन मोठे देश समजले जातात.
कशी असणार बुलेट ट्रेन ?
10 डब्यांच्या या बुलेट ट्रेनमध्ये 750 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असेल. या ट्रेनमुळे दोन शहरांमधला सात तासांचा प्रवास तीन तासांवर येणार आहे. पुढे या ट्रेनला 16 डब्बे असतील. त्यामधून एकाचवेळी 1200 जणांना प्रवास करता येईल. बुलेट ट्रेनच्या या एकूण प्रकल्पासाठी 1.10 लाख कोटींचा खर्च येणार आहे. त्यातील 88 हजार कोटी रुपये जपान कर्ज म्हणून देणार आहे. 2022 पर्यत हा प्रकल्प पूर्ण करायचा उद्देश आहे. त्याचवर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.