जशोदाबेन म्हणाल्या, मी मोदींची पत्नी; ते माझे राम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 09:23 AM2018-06-21T09:23:00+5:302018-06-21T09:23:00+5:30
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्नी आहे आणि ते माझे राम आहेत, असे वक्तव्य...
अहमदाबाद - मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्नी आहे आणि ते माझे राम आहेत, असे वक्तव्य मोदींच्या विभक्त राहणाऱ्या पत्नी जशोदाबेन यांनी केले आहे. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याच्या केलेल्या दाव्यावर जोरदार टीका करताना जशोदाबेन यांनी हे वक्तव्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविवाहित असल्याचा दावा मध्य प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केला होता. आनंदीबेन पटेल यांच्या या वक्तव्याबाबत जशोदाबेन यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या, आनंदीबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अविवाहित असल्याचा दावा केल्याने मला धक्का बसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अर्ज भरताना मोदींनी स्वत: विवाहित असल्याचे शपथपत्र देत पत्नीच्या रकान्यात माझ्या नावाचा उल्लेख केला होता."
आनंदीबेन यांचे वक्तव्य अशोभनीय असल्याची टीका करताना जशोदाबेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राहत नसले तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असल्याचे जशोदाबेन यांनी सांगितले. आनंदीबेनसारख्या एका सुशिक्षित महिलेने एका शिक्षिकेबाबत असे बोलणे अशोभनीय आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी हे माझ्यासाठी सन्माननीय आहेत. ते माझ्यासाठी रामासारखे आहेत." असे जशोदाबेन म्हणाल्या. दरम्यान, आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना जशोदाबेन यांचे भाऊ अशोक मोदी यांनी हे वक्तव्य जशोदाबेन यांचेच असल्याचे सांगितले.
आनंदीबेन पटेल यांचे वक्तव्य जेव्हा सोशल मीडियावर प्रसारित झाले तेव्हा आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी या वक्तव्याचे वृत्त जेव्हा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले तेव्हा आम्ही याचा उत्तर देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जशोदाबेन यांची प्रतिक्रिया मोबाइलवर रेकॉर्ड करून आम्ही प्रसारित केली, असे अशोक मोदी यांनी सांगितले. .'