वीज विभागाचा कारनामा! ना विजेचा खांब, ना घरात कनेक्शन; तरी मजुराला एक लाखाहून अधिक बिल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 06:05 PM2022-05-18T18:05:11+5:302022-05-18T18:07:59+5:30
राम खेलवान यांच्या घराला वीज कनेक्शन नसताना एक लाख चार हजारांहून अधिकचे बिल पाठवण्यात आलं आहे. भरमसाठ वीज बिल पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये वीज विभागाच्या निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील सिकरारा भागातील वनसफा गावातील एका वस्तीत राहणाऱ्या राम खेलवान यांच्या घराला वीज कनेक्शन नसताना एक लाख चार हजारांहून अधिकचे बिल पाठवण्यात आलं आहे. भरमसाठ वीज बिल पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने कुटुंबीयाना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
जौनपूरच्या सिकरारा भागातील वनसफा गावात राहणारे राम खेलावन यांनी बिलावरून आतापर्यंत जिल्हा वीज कार्यालय ते स्थानिक कार्यालयापर्यंत संपर्क साधला, परंतु याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. त्याचबरोबर पीडित कुटुंबीयांना या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून एकच आशा आहे, त्यामुळे त्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.
विजेचा खांब नाही, तार नाही तरी बिल एक लाखापेक्षा जास्त
धक्कादायक बाब म्हणजे विजेचं कनेक्शन न घेताच राम खेलावन यांच्या घरी एक लाखाहून अधिकचे बिल आलेलं आहे. खेलावन यांच्या घराभोवती ना विद्युत खांब आहे, ना तार. तसेच एकही बल्ब न लावता एवढ्या रकमेचे विजेचे बिल आल्याने पीडित कुटुंबाची अवस्था वाईट झाली आहे. पीडित कुटुंबीयांनी न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या प्रकरणाबाबत उपकेंद्रापासून ते जिल्हा विद्युत कार्यालयापर्यंत चकरा मारल्या, परंतु या प्रकरणाचा तपास करूनही सुधारणा झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जौनपूरच्या सिक्रारा भागातील वनसाफा गावातील राम खेलावन यांच्या घरी अद्याप वीज पोहोचलेली नाही आणि त्यांनी कधीही वीज कनेक्शनसाठी अर्जही केलेला नाही. असे असतानाही त्यांच्या नावावर तब्बल एक लाख चार हजार तीनशे बारा रुपयांचे वीज बिल आले आहे. यासाठी वारंवार स्थानिक उपकेंद्राच्या कार्यालयात चकरा मारत असूनही त्यांची सुनावणी होत नसल्याचे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.