पक्षविरोधी कारवाया करणा-या 21 जणांना जेडीयूने केले निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 03:46 PM2017-08-14T15:46:09+5:302017-08-14T15:47:52+5:30
संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये भाजपाबरोबर आघाडी करुन सरकार स्थापन केल्यापासून जेडीयूमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.
नवी दिल्ली, दि. 14 - संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये भाजपाबरोबर आघाडी करुन सरकार स्थापन केल्यापासून जेडीयूमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. सोमवारी जदयूने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन 21 सदस्यांना निलंबित केले. नितीश कुमारांचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय जदयूच्या अनेक नेत्यांना पटलेला नाही.
ही आघाडी झाल्यापासून सातत्याने पक्षविरोधी सूर लावणारे जदयूचे प्रमुख नेते शरद यादव यांना अखेर शनिवारी राज्यसभेच्या नेतपदावरुन हटवण्यात आले. राज्यसभेतील जदयूचे भाजपा खासदार अली अन्वर यांना सुद्धा हा निर्णय पटलेला नाही.
गुजरात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्या विजयानंतर शरद यादव यांनी टि्वटकरुन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. वास्तविक जदयूने या निवडणुकीत भाजपाला साथ दिली होती.
आता कोणालाच घाबरत नाही - शरद यादव
जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी फेटाळून लावली आहे. बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने शरद यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. आपली ही नाराजी त्यांनी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जेडीयूमधील काही नेते करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असं सांगितलं आहे.
जेडीयूचे संसदीय नेते शरद यादव यांनी सांगितलं की, 'काही नेता मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी इंदिरा गांधींचाही न घाबरता सामना केला आहे. मग मला घाबरवणारे हे कोण ?. नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी आणि विरोध लोकांसमोर मांडण्यासाठी शरद यादव यांनी राज्यात संवाद यात्रा काढली असून लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी अप्रत्यक्षपणे संयुक्त जनता दलातून बाहेर पडण्याचा सल्ला ज्येष्ठ नेते शरद यादव आणि त्यांच्या समर्थकांना दिला.
त्यामुळे पक्षात फूट अटळ आहे. पक्षाचे केरळमधील राज्यसभा सदस्य वीरेंद्र कुमार यांनी यापूर्वीच नितीश यांचा निर्णय आपणास मान्य नसून, आपण केरळमध्ये प्रादेशिक पक्ष स्थापन करून तेथील काँग्रेस प्रणीत युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटमध्ये सहभागी होणार आहोत, असे जाहीर केले आहे.