लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: जेईई मुख्य परीक्षा- २०२१ चा पेपर लीकप्रकरणी सोमवारी मिखाइल शार्गिन या रशियन नागरिकाला पकडले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची कोठडी दिली आहे. तो मुख्य हॅकर असल्याचा संशय आहे. शार्गिनने परीक्षा सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड केली. याच सॉफ्टवेअरवर जेईई मुख्य परीक्षा होणार होती.
सीबीआयने चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली असता न्यायाधीश वैभव मेहता यांनी आरोपीला ६ ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडीत पाठविले. सीबीआयने आरोपीची पाच दिवसांची कोठडी मागितली होती. त्याचा फोन, लॅपटॉप आणि हार्ड डिस्कमधील डेटाबाबत चौकशी करायची असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते. सीबीआयने शार्गिनविरुद्ध लूक आउट नोटीस जारी केली होती.
प्रत्येकी १५ लाख
- तपास एजन्सीने गतवर्षी सप्टेंबरमध्ये एफिनिटी एज्युकेशन प्रा. लि. आणि त्यांच्या तीन संचालकांविरुद्ध सिद्धार्थ कृष्ण, विश्वंभर मणि त्रिपाठी आणि गोविंद वार्ष्णेय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
- हे तिघे अन्य सहकाऱ्यांच्या साथीने जेईई मुख्यच्या ऑनलाइन परीक्षेत छेडछाड करून आणि उमेदवारांकडून मोठी रक्कम घेऊन देशातील प्रमुख संस्थांमध्ये त्यांना प्रवेश घेऊन देणार होते. इच्छुकांची दहावी व बारावीची गुणपत्रिका, यूजर आयडी, पासवर्ड, पोस्ट डेटेड चेक गोळा करणार होते. प्रवेश निश्चितीनंतर ते कमिशन म्हणून प्रत्येकाकडून १२ ते १५ लाख रुपये घेणार होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"