श्रीनगर - पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे.
''दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISIचा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे'',असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केला आहे. तसंच आगामी काळातही दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवली जाईल आणि काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल. त्यांना जिवंत सोडलं जाणार नाही', असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले आहे.
''किती गाझी आले आणि किती गेले''काश्मीर पोलीसचे आयजी एसपी पाणि यांनी सांगितले की, 2018मध्ये जैश-ए-मोहम्मदचे 56 दहशतवादी मारले गेले. यावर्षी आतापर्यंत एकूण 31 दहतशवादी ठार करण्यात आले, यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 12 दहशतवाद्यांचा समावेश आहे.
लेफ्टनंट जनरल ढिल्लन यांनी म्हटले की, 'किती गाझी आले आणि किती गेले, घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला ठार करणारच. काश्मीर खोऱ्यात कोणीही घुसखोरी केल्यास त्याची गय केली जाणार नाही. कोणताही दहशतवादी जिवंत राहणार नाही'.
काश्मीरमधील मातांना भारतीय लष्कराचे आवाहनयावेळेस भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील पालकांना कळकळीचे आवाहनदेखील केले. ''दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या तुमच्या मुलांना समजवा आणि त्यांना माघारी बोलवा. चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना समर्पण करायला लावा, असे आमचे जम्मू काश्मीरमधील मातांना आवाहन आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांसाठी आम्ही कित्येक चांगले उपक्रम राबवत आहोत. पण हातात बंदूक घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही'', असा स्पष्ट इशारा यावेळेस भारतीय लष्कराकडून देण्यात आला.
आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत - भारतीय लष्करसीआरपीएफचे आयजी जुल्फिकार हसन यांनी सांगितले की, 'शहीद जवानांच्या कुटुंबीयांना स्वतःला एकटे समजू नये. तुमच्यासोबत आम्ही सदैव उभे आहोत. शिवाय, देशातील निरनिराळ्या भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी मुलांसहीत आम्ही हेल्पलाइन चालवत आहोत. जेणेकरुन त्यांना कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू नये'
कोण आहे अब्दुल रशीद गाझी ?जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो आयईडी स्फोटांचा एक्स्पर्ट असल्याचेही बोलले जाते. 9 डिसेंबर2018ला तो पाकिस्तानातून काश्मीरमध्ये दाखल झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेने काश्मीरमध्ये सुरू केलेल्या कॅम्पमध्ये गाझी हा प्रमुख ट्रेनर होता. तो काश्मीरमध्ये घुसल्याचे कळताच सुरक्षा संस्थांनी अॅलर्ट जारी केला होता. गाझी हा 'जैश-ए-मोहम्मद'चा तो टॉप ट्रेनर आहे. तो यापूर्वी अफगाणिस्तानातील तालिबानी अतिरेकी संघटनांमध्येही होता. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालणा-या अतिरेक्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तो प्रमुख होता आणि नव्याने संघटनेत दाखल झालेल्यांना ट्रेन करण्याची प्रमुख जबाबदारी त्याच्यावरच होती.