नवी दिल्ली - दलित नेता व गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या नवी दिल्लीतील युवा हुंकार रॅलीवरुन वाद निर्माण झाला आहे. मोदी सरकारविरोधातील मेवाणी यांच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही मेवाणी व त्यांचे समर्थक रॅलीवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
जंतर-मंतरच्या दिशेनं जात असताना जिग्नेश मेवाणी यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रॅलीला परवानगी नाकारणं ही बाब दुर्दैवी आहे. आम्ही तर केवळ लोकशाही व शांततापूर्ण मार्गानं निदर्शनं करणार आहोत. सरकार आम्हाला टार्गेट करत आहे. एका लोकप्रतिनिधीला बोलण्यापासून अडवण्यात येत आहे'. तर दुसरीकडे, जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शिवाय, निदर्शनं केल्यास कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
डीसीपींचं ट्विट एनजीटीच्या (राष्ट्रीय हरित लवादा) आदेशानुसार आतापर्यंत संसद मार्गावर प्रस्तावित निदर्शनास दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही, असे ट्विट नवी दिल्लीचे डीसीपींकडून सोमवारी रात्री उशीरा करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना दुस-या ठिकाणी निदर्शनं करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, मात्र यास आयोजकांनी तयारी दर्शवलेली नाही.
जिग्नेश मेवाणी-उमर खालिदविरोधात गुन्हा
दरम्यान, पुण्यामध्ये ३१ डिसेंबर रोजी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मेवानी म्हणाले होते की, उना येथील प्रकरण असो की, कोरेगाव भीमाचे असो, मोदी याबाबत शब्दही बोलले नाहीत. गुजरातमध्ये भाजपाच्या जागा 99 पर्यंत कमी झाल्यानंतर भाजप व संघ मला लक्ष्य करीत आहेत. निवडून आलेल्या दलित नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर, देशातील गरीब दलितांची काय अवस्था असेल, याची कल्पना केली जाऊ शकत नाही. या लोकांना सुरक्षित कसे काय वाटू शकेल?
'मोदींनी मौन सोडावं'
कोरेगाव भीमाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावं, नाहीतर याचा परिणाम 2019 मध्ये दिसून येईल, असा इशारा देत मेवाणीनं हुंकार युवा रॅली काढणार असल्याचं सांगितले होते. 5 जानेवारीला पत्रकार परिषद घेत मेवाणीनं हा इशारा दिला होता. यावेळी पंतप्रधान कार्यलयात जाऊन एका हातात मनुस्मृती आणि एका हातात संविधान घेऊन जाणार आणि या दोन्हींपैकी कशावर विश्वास ठेवता, असा जाब पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारणार असल्याचे जिग्नेश मेवाणी म्हणाले होते.
'माझ्यासारख्या प्रस्थापित दलित नेत्याला लक्ष्य करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लाखो दलित बांधवांना काय संदेश देत आहेत, असा सवालही यावेळी केला होता. याचबरोबर, देश कॅशलेस होण्याआधी कास्टलेस होण्याची आवश्यकता असल्याचे जिग्नेश मेवाणी म्हणाले होते.