कोळसाप्रकरणी जिंदल, राव, कोडा व इतरांना जामीन
By admin | Published: May 23, 2015 12:04 AM2015-05-23T00:04:53+5:302015-05-23T00:04:53+5:30
काँग्रेस नेते व उद्योगपती नवीन जिंदल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा व अन्य सात जणांना शुक्रवारी जामीन मंजूर केला.
नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणी विशेष न्यायालयाने काँग्रेस नेते व उद्योगपती नवीन जिंदल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा व अन्य सात जणांना शुक्रवारी जामीन मंजूर केला.
जिंदल, राव, कोडा आणि माजी कोळसा सचिव हरीशचंद्र गुप्ता व अन्य विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांच्या न्यायालयात आरोपी म्हणून हजर झाले होते व या प्रत्येकाने जामिनासाठी स्वतंत्र अर्ज सादर केला होता. ‘सीबीआयने जेव्हा-जेव्हा बोलावले तेव्हा-तेव्हा माझे अशील तपासात सहभागी झाले आणि त्यांच्या फरार होण्याची वा न्यायापासून पळ काढण्याची भीती नाही,’ असे जिंदल यांचे वकील रमेश गुप्ता यांनी सांगितले. अन्य नऊ आरोपींच्या वकिलांनीही युक्तिवाद केला.
वरिष्ठ सरकारी वकील व्ही.के. शर्मा म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी हायप्रोफाईल उद्योगपती व राजकारणी आहेत व फिर्यादी पक्षाचे बहुतांश साक्षीदार हे त्यांचे कर्मचारी आहेत. आरोपींना जामीन मिळाला तर ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू
शकतात.
दरम्यान आरोपींनी आपल्या परवानगीशिवाय भारत सोडून जाऊ नये, असे सांगून न्या. पाराशर
यांनी पुढील सुनावणीसाठी १ जून ही तारीख निश्चित केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४कोळसा खाणपट्टे वाटप करण्याचा निर्णय त्यांच्या (डॉ. मनमोहनसिंग यांच्या) कार्यालयाने घेतला होता, असे माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी शुक्रवारी विशेष न्यायालयात सांगितले. त्यावेळी मनमोहनसिंग यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचाही प्रभार होता. मनमोहनसिंग हे या प्रकरणातील एक आरोपी आहेत.