भाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा सोमवारी निवडले जाणार; निवड बिनविरोध होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 06:45 AM2020-01-18T06:45:02+5:302020-01-18T06:45:15+5:30
राज्यसभेचे सदस्य असलेले नड्डा पक्षाच्या सर्वोच्च संसदीय बोर्डचे सचिवही आहेत.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा २० जानेवारी रोजी पक्षाचे विधीवत अध्यक्ष बनतील. राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सोमवारी नड्डा त्या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्याविरोधात कोणी नसल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री व राज्यांचे प्रदेश अध्यक्ष नड्डा यांच्या नावाला अनुमोदन देतील. अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर नड्डा यांच्या नावाची घोषणा केली जाईल.
२० जानेवारी रोजी सकाळी १० ते १२.३० ही अर्ज भरण्याची वेळ आहे. माजी केंद्रीय मंत्री व निवडणूक अधिकारी राधा मोहन सिंह यांनी गरज भासली तर २१ जानेवारी रोजी सकाळी १० ते दोन वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल, असे सांगितले. देशभरात ७५ टक्के बूथ समित्या आणि ५० टक्के मंडळ समित्या आणि ६० टक्के जिल्हा समित्यांची नियमांनुसार स्थापना झाली आहे. याशिवाय २१ राज्यांचे प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांचीही निवडही पूर्ण झाली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, अध्यक्षांची निवड सर्वसंमतीने व निवडणूक प्रक्रियेचे पालन करून होते. निवडणुकीसाठी सगळे प्रदेश अध्यक्ष, संघटन सरचिटणीस आणि राज्यांच्या कोअर ग्रुप सदस्यांना २० जानेवारी रोजी दिल्लीत बोलावले आहे.
जे. पी. नड्डा यांचा राजकीय प्रवास
राज्यसभेचे सदस्य असलेले नड्डा पक्षाच्या सर्वोच्च संसदीय बोर्डचे सचिवही आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झाला. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन अध्यक्षपदासाठीची निवडणूक टाळली गेली. शहा केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे नड्डा यांना जून महिन्यात कार्यकारी अध्यक्ष बनवले गेले.
नड्डा मोदी सरकार-१ मध्ये आरोग्य मंत्री होते. विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघटनेत त्यांनी वेगवेगळ््या जबाबदाºया पार पाडल्या. ते पहिल्यांदा १९९३ मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य बनले. नंतर ते राज्यात व केंद्रातही मंत्री बनले होते.