“भ्रष्टाचाराचे आरोप, १० वर्षांत ७४० आमदार-खासदार भाजपात, बहुतांश काँग्रेसचे”: JMM
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 04:06 PM2024-02-20T16:06:32+5:302024-02-20T16:06:41+5:30
JMM News: काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
JMM News: गेल्या काही दिवसांपासून देशभर भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर राजस्थानमधील काँग्रेसला मोठा झटका बसला असून, महेंद्रजीत सिंह मालवीय यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आगामी काळात ही संख्या वाढू शकते, असा कयास बांधला जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या १० वर्षांत भाजपामध्ये गेलेल्या आमदार आणि खासदारांची संख्या ७४० असून, यातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तसेच बहुतांश नेते काँग्रेसचे होते, असे झारखंड मुक्ती मोर्चाने म्हटले आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना झारखंड मुक्ती मोर्चाचे महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपावर सडकून टीका केली आणि काही गंभीर आरोपही केले. भाजपावाले म्हणतात की, त्यांच्यासाठी आदिवासींचा सन्मान याला सर्वोच्च प्राधान्य आहे. पण, त्यांना आदिवासी मुख्यमंत्री नको. आदिवासी मुख्यमंत्री असेल तर त्याला तुरुंगात पाठवले जाईल, असे धोरण भाजपाने राबवले आहे, असा आरोप सुप्रियो भट्टाचार्य यांनी केला. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली. ते सध्या तुरुंगात आहेत. याचा संदर्भ देत भट्टाचार्य यांनी टीकास्त्र सोडले.
काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे
भाजपाने यापूर्वी अनेकता काँग्रेसमुक्त भारत असा नारा दिला होता. मात्र, आता त्या पक्षाची अवस्था ही काँग्रेसयुक्त भाजपा झाली आहे. गेल्या १० वर्षांत ७४० खासदार, आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यातील बहुतांश सदस्य हे काँग्रेसचे होते. विशेष म्हणजे या सगळ्यांवर भाजपाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता तेच लोक त्यांचे आवडते झाले आहेत, या शब्दांत सुप्रियो भट्टाचार्य यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, २०१४ ते २०२४ या काळात देशामध्ये अनेक अजब गोष्टी घडल्याचे दिसून आले. अगदी काय खावे, परिधान करावे, अभ्यास करावा, अगदी काय ऐकावे यासंदर्भातही सूचना, आदेश देण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांच्यामते विरोधात असणारे सगळे भ्रष्ट आहेत. भाजपामध्ये असणारे सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. जे सरकारच्या धोरणांना विरोध करतात, ते राष्ट्रविरोधी आहेत, असेही त्यांचे म्हणणे आहे, अशी घणाघाती टीका भट्टाचार्य यांनी केली.