नवी दिल्ली- विद्यार्थिनींवर अश्लील भाष्य आणि टिपण्णी केल्याचा आरोप असलेले जेएनयूचे प्रोफेर अतुल जोहरींच्या विरोधात सोमवारी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेने जोहरींच्या अटकेची मागणी करत संध्याकाळी सहा वाजता वसंत कुंज पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. वसंत कुंज पोलीस स्टेशनजवळ पोलीस व विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याची फवारणी केल्याचं समोर येत आहे.
स्कूल ऑफ लाइफ सायन्सचे प्रोफेसर जोहरीविरोधात 9 विद्यार्थिनींवर अश्लील भाष्य आणि टिपण्णी केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर #ArrestJohri असा हॅशटॅग सुरू केला असून जोहरी यांना अटक करण्याची जोरदार मागणी सोशल मीडियावर केली जाते आहे. दुसरीकडे, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या वागणुकीचा निषेध करत पीडित महिलांचं समर्थन केलं आहे.
स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना समर्थन दाखविलं.' 9 विद्यार्थिनींवर अश्लील भाष्य आणि टिपण्णी करणारं प्रकरण अतिशय हैराण करणारं आहे. हा व्यक्ती सीरियल ऑफेंडर वाटतो. सगळ्यात हैराण करणारं म्हणजे आत्तापर्यंत दिल्ली पोलिसांनाही आरोपीला अटक केली नाही. डीसीडब्लू या प्रकरणात नोटीस जारी करत आहे. आम्ही तक्रारकर्त्यांसह आहोत, असं ट्विट स्वाती मालीवाल यांनी केलं आहे.
जोहरीविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या काही प्रोफेसर्सनीही पाठिंबा दिला आहे. 54 प्रोफेसर्सनी पोलिसांवर प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप करत प्रोफेसर जोहरी विरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करण्याची मागणी केली आहे.