देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. सध्या दुसऱ्या लाटेचं प्रमाण काहीसं कमी झालं असलं, तरी तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रानं मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, आता भारतात ग्लोबल हेल्थकेअर प्रमुख जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson and Johnson) सिंगल डोसच्या करोना प्रतिबंधात्मक लसीला मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनरसुख मांडविया यांनी यासंदर्भातील माहिती दिली. "भारतानं आपल्या वॅक्सिन बास्केटचा विस्तार केला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन च्या सिंगल डोसच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे ५ EUA लसी आहेत," असं मांडविया म्हणाले. ६ ऑगस्ट रोजी कंपनीनं माहिती देत आपल्या सिंगल डोस लसीच्या आपात्कालिन वापरास अर्ज केल्याचं सांगितलं होतं. "५ ऑगस्ट २०२१ रोजी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडनं भारत सरकारकडे आपल्या सिंगल डोस कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरासाठी अर्ज केला होता," असं कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. सध्या देशात Covaxi, Covishield आणि रशियाच्या Sputnik V चे डोस नागरिकांना देण्यात येत आहेत. या तिन्ही लसींचे दोन डोस घेणं आवश्यक आहे.