नवी दिल्ली - पत्रकार प्रशांत कनौजिया यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भडकाऊ पोस्ट केल्याप्रकरणी दिल्ली येथील निवास्थातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राम मंदिर भूमीपूजनावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भूमीपूजनासंदर्भात आपत्तीजनक ट्विट केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. लखनौ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात प्रशांत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पत्रकार प्रशांत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये, राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाला आपणास का बोलविण्यात आलं नाही ? असा प्रश्न विचारत कनौजिया यांनी विचारला होता. त्यावरुन, जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवत कनौजिया यांना दिल्ली व युपी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली आहे.
“कितना भी समर्थन कर लो निमंत्रण तो मिला नहीं क्योंकि वो आपको अछूत मानते हैं लेकिन आप जैसे गुलामों को भारत के इतिहास में चमचा ही कहा जायेगा। कांशीराम ने आप जैसे लोगों के लिए ही चमचा युग लिखा था। शर्म आनी चाहिए ऐसे राष्ट्रपति को। धिक्कार है।”
या आशयाचे ट्विट प्रशांत यांनी राम मंदिर भूमीपजन कार्यक्रमाच्या कालावधीत केले होते. यापूर्वीही 8 जून 2019 रोजी प्रशांत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध आपत्तीजनक टीका केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सध्या, प्रशांत हे मुक्त पत्रकार म्हणून काम करतात.