नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने गाव वसवल्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी जोरदार पलटवार करत चीनवरून काँग्रेस खोटे बोलणे केव्हा बंद करणार, असा सवाल केला आहे.
जेपी नड्डा यांनी एकामागून एक ट्विट करत, काँग्रेसवर टीका केली आहे. राहुल गांधी महिन्याभराच्या सुट्टीवरून आता परत आले आहेत. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. राहुल गांधी या प्रश्नांची उत्तरे देतील, अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी, गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस चीनवरून खोटे बोलणे केव्हा थांबवणार, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अरुणाचल प्रदेशसह हजारो किलोमीटरची जमीन चीनला भेट म्हणून दिली, ही बाब काँग्रेस नाकारणार का, अशी विचारणा जेपी नड्डा यांनी केली आहे.
काँग्रेस वारंवार चीनसमोर गुघडे का टेकते, असा सवाल करत राहुल गांधींचा चीन आणि कम्युनिस्ट पक्षाशी केलेले करार रद्द करण्याचा काय विचार आहे का, चीनकडून ट्रस्टसाठी मिळालेल्या देणग्या परत करणार का, असे खरमरीत सवाल जेपी नड्डा यांनी विचारले.
तसेच राहुल गांधी यांनी कोरोना विरोधातील लढाई सुरू असताना देशाला कमीपणा दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करून लस शोधून काढली. राहुल गांधी यांनी शास्त्रज्ञांचे एकदाही अभिनंदन किंवा कौतुक केले नाही, अशी टीका जेपी नड्डा यांनी केली.
कृषी कायद्याविरोधा शेतकऱ्यांना भडकवणे आणि गैरसमज पसरवणे केव्हा थांबवणार? एपीएमसी सर्व मंडया बंद करणार असल्याचे सांगत राहुल गांधी खोटी माहिती पसरवत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींवर काँग्रेस सरकारने अंमलबजावणी का केली नाही. विरोधी बाकांवर असतानाच काँग्रेसला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती का वाटते, काँग्रेस सत्तेत असताना शेतकऱ्यांची प्रगती का झाली नाही, अशी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती जेपी नड्डा यांनी केली.