रुग्णाबाबत महिला न्यायाधीशांनी वाचली बातमी अन् थेट पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये..., आता होतंय खूप कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 02:55 PM2024-11-21T14:55:48+5:302024-11-21T15:02:15+5:30
न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले.
बेगुसराय : सध्या बिहारच्या बेगुसरायमध्ये न्यायाधीश मंजु श्री यांची खूप चर्चा होत आहे. दरम्यान, महिला न्यायाधीश मंजू श्री यांनी वृत्तपत्रातील बातमी वाचून एका रुग्णाला मदत करून नवा आदर्श घालून दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उप-न्यायाधीश (वरिष्ठ श्रेणी) सह सचिव मंजू श्री, अचानक बेगुसरायच्या सदर हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाशी लढा देत असलेल्या रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचल्या.
न्यायाधीश मंजू श्री यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदर हॉस्पिटल गाठले आणि सिव्हिल सर्जनला चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. दरम्यान, विजय कुमार नावाचा रुग्ण बेगुसराय सदर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे, रक्ताच्या कमतरतेमुळे तो आपल्या जीवाशी लढत आहे. न्यायाधीश मंजू श्री यांना या रूग्णाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सदर हॉस्पिटल गाठून सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद कुमार यांना चांगले उपचार करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर सदर रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडून २ युनिट रक्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
न्यायाधीश मंजू श्री यांनी सांगितले की, वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीत विजय कुमार नावाची व्यक्ती सदर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. रुग्णाच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण (२.५ ग्रॅम) फारच कमी आहे . त्यानंतर मी स्वत: सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रक्तपेढीच्या प्रभारी डॉ. पूनम सिंग यांनी आयसीयूमध्ये पोहोचून रुग्णाची प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी डॉक्टर हरिगोविंद रुग्णावर उपचार करत होते. यानंतर, सीएस यांना कोणत्याही परिस्थितीत रक्ताची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, महिला न्यायाधीशांच्या सूचनेनंतर रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णाला दोन युनिट रक्त देण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच, न्यायाधीश मंजुश्री यांच्या या पावलाची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे.
कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी काय सांगितले?
वर्षभरापूर्वी काही रक्तविक्रेत्यांनी विजय यांना हाजीपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर नेले आणि त्यांच्या शरीरातून रक्त काढले. त्यानंतर विजय हे आजारी पडले आणि हळूहळू त्यांचा आजार वाढत गेला. आज ते आयसीयूमध्ये आयुष्याशी झुंज देत आहेत, असे कुटुंबीयांनी सांगितले. तर रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर हरिगोविंद यांनी सांगितले की, रक्तस्त्राव होत असल्याच्या तक्रारीवरून रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर बरीच सुधारणा झाली आहे, तो आला तेव्हा त्याच्या शरीरात फक्त २.५ ग्रॅम हिमोग्लोबिन होते.