न्यायाधीशांचे म्हणणे योग्य, पण... सर्वोच्च न्यायालयातील वकिलांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:30 AM2018-01-13T01:30:54+5:302018-01-13T01:31:03+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जे आरोप केले, ते पाहता सर्वोच्च न्यायालयाला कोणीतरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ध्वनित होत आहे. सर्वोच्च न्यायालय हे नियंत्रणमुक्तच असले पाहिजे. सरकारनेही असे प्रयत्न करण्यापासून लांब राहायला पाहिजे, असे मत प्रख्यात कायदेतज्ज्ञ राजीव धवन यांनी व्यक्त केले.

The judges are right, but ... the opinion of the Supreme Court advocates | न्यायाधीशांचे म्हणणे योग्य, पण... सर्वोच्च न्यायालयातील वकिलांचे मत

न्यायाधीशांचे म्हणणे योग्य, पण... सर्वोच्च न्यायालयातील वकिलांचे मत

Next

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जे आरोप केले, ते पाहता सर्वोच्च न्यायालयाला कोणीतरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ध्वनित होत आहे. सर्वोच्च न्यायालय हे नियंत्रणमुक्तच असले पाहिजे. सरकारनेही असे प्रयत्न करण्यापासून लांब राहायला पाहिजे, असे मत प्रख्यात कायदेतज्ज्ञ राजीव धवन यांनी व्यक्त केले.
माजी कायदामंत्री अश्विनी कुमार म्हणाले की, भारताच्या इतिहासातील हा दु:खद दिवस आहे. न्यायालयातील घटना सांगण्यासाठी न्यायाधीशांना बाहेर यावे लागले. सरन्यायाधीश प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक उपाय करतील, असा विश्वास मला आहे.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ इंदिरा जयसिंह म्हणाल्या की, न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे घटनात्मक पेचप्रसंग उद्भवणार नाही. किंबहुना लोकशाही अधिक बळकट होईल. न्यायालयाच्या कारभारातील पारदर्शकता यामुळे वाढेल व जनतेचा न्याययंत्रणेवरील विश्वासही अधिक दृढ होईल. या न्यायाधीशांनी व्यवस्थेबद्दलचे आपले आक्षेप मांडले आहेत. ही व्यवस्था दुरुस्त करणे शक्य आहे.
नामवंत कायदेतज्ज्ञ के. टी. तुलसी म्हणाले की, कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळेच या चार न्यायाधीशांची पत्रकार परिषद घेतली आहे. या न्यायाधीशांवर ही पाळी का आली याचाही विचार होणे आवश्यक आहे. अ‍ॅड. जयवीर शेरगिल म्हणाले की, न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाची विश्वासार्हता टिकून राहावी म्हणून आता योग्य पावले उचलली जायला हवीत. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी आशा सामान्य माणूस मनात बाळगून असतो. त्याच न्यायालयात असे प्रकार घडायला लागले तर मग विश्वासार्हतेच्या ठिकºया उडायला वेळ लागणार नाही.

आज निघेल तोडगा
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणे योग्य नव्हते. त्यांनी पत्रकार परिषद घेणे टाळायला हवे होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये जो वाद उत्पन्न झाला आहे त्यावर शनिवारपर्यंत नक्की तोडगा निघेल.
- के. के. वेणुगोपाल, अ‍ॅटर्नी जनरल

पद्धत चुकीची
न्यायाधीशांनी जे मुद्दे मांडले ते बरोबर आहेत. मात्र त्या मुद्द्यांचे निराकरण ज्या पद्धतीने व्हावे असे या न्यायाधीशांना वाटते ती पद्धत चुकीची आहे. प्रसारमाध्यमांसमोर जाण्याचा पत्करलेला मार्ग योग्य नाही. कुटुंबातील भांडणे रस्त्यावर आणण्याचे काहीही कारण नव्हते.
- एन. संतोष हेगडे,
माजी सॉलिसिटर जनरल

मी उद्विग्न झालोय
चार न्यायाधीशांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या घटनेने मी उद्विग्न झालो आहे. हे पाऊल टाळता आले असते. अशा गोष्टींचे न्याययंत्रणेवर विपरीत परिणाम होऊ शकतात.
- सोली सोराबजी,
माजी अ‍ॅटर्नी जनरल

Web Title: The judges are right, but ... the opinion of the Supreme Court advocates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.