नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्याविरोधात पत्रकार सभा घेऊन टीका करणारे न्यायाधीश जस्ती चेलमेश्वर यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस होता. लोकशाहीच्या संरक्षणासाठी चेलमेश्वर यांनी कार्य केले अशा शब्दांमध्ये त्यांचे कौतुक न्यायालयातील विविध ज्येष्ठ विधिज्ञांनी केले.ज्येष्ठ विधिज्ञ राजीव दत्ता यांनी चेलमेश्वर यांनी लोकशाहीच्या मुल्यांचा नेहमीच आदर केला असे सांगत त्यांना धन्यवाद दिले. तर प्रशांत भूषण यांनीही चेलमेश्वर यांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी काम करण्याचं मोठं काम केलं आहे असे सांगत तुमची नेहमीच आठवण येईल अशा शब्दांमध्ये भावना मांडल्या. कनिष्ठ सहकाऱ्यांना चेलमेश्वर यांनी चांगलीच वागणूक दिली त्यामुळे कनिष्ठ वकिल त्यांची नेहमीच आठवण काढतील अशा शब्दांमध्ये चेलमेश्वर यांचे आभार मानले.प्रथेप्रमाणे निवृत्त होणारे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या क्रमांक 1 च्या कोर्टरुममध्ये शेवटच्या दिवशी सरन्यायाधिशांसमवेत खंडपिठात सहभागी होतात. सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्यायाधीश चेलमेश्वर आणि न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचे खंडपीठ 15 मिनिटांसाठी बसले, त्यांच्यासमोर 11 प्रकरणांची यादी होती. यावेळेस सर्व कक्ष वकिलांनी भरून गेला होता. मात्र सुप्रिम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मात्र यावेळेस उपस्थित नव्हते. चेलमेश्वर यांनी असोसिएशनतर्फे निरोप समारंभ स्वीकारण्यास नकार दिला होता. चेलमेश्वर 22 जून रोजी निवृत्त होणार आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुटी सुरु होत असल्याने आज कामकाजाचा त्यांचा शेवटचा दिवस होता.