न्या. लोया मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी हवी - राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:31 AM2018-01-13T01:31:48+5:302018-01-13T01:31:57+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी केलेल्या आरोपानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले. न्यायाधीशांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे असून, न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी केलेल्या आरोपानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले. न्यायाधीशांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे असून, न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आरोपी असलेल्या प्रकरणाची चौकशी न्या. लोया यांच्यापुढे सुरू होती.
पत्रकार परिषदेत छोटेखानी निवेदन करताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने काळजी न घेतल्यास देशात लोकशाही टिकणार नाहीत, हे न्या. जे. चेलमेश्वर यांचे वक्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे. ते सर्वांनी गंभीरपणे घ्यायला हवे.
काँग्रेसनेही लोकशाही धोक्यात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माकपने केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून म्हटले आहे की, चार न्यायाधीशांनी जे मत व्यक्त केले आहे त्यावरून आम्ही चिंतित आहोत. माकपचे महासचिव सीताराम येचुरी म्हणाले की, न्यायपालिकेची स्वतंत्रता आणि अखंडता यावर चार न्यायाधीशांच्या वक्तव्यातून प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढायला हवा. कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या आधारांसाठी हे आवश्यक आहे.