न्या. बोबडे राज्याने देशाला दिलेले नववे सरन्यायाधीश; नागपूरचा दुसरा सुपुत्र भूषविणार सर्वोच्च पद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 02:09 AM2019-10-30T02:09:54+5:302019-10-30T02:10:15+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नात्याने न्या. बोबडे यांनी गेल्या सहा वर्षांत अनेक महत्वाचे निकाल दिले
नवी दिल्ली : न्या. शरद अरविंद बोबडे येत्या १८ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील, तेव्हा महाराष्ट्राने देशाला दिलेले ते नववे सरन्यायाधीश ठरतील. न्या. मोहम्मद हिदायतुल्ला यांच्यानंतर हे पद भूषविणारे न्या. बोबडे हे नागपूरचे दुसरे सुपुत्र असतील.
न्या. सरोश कापडिया यांच्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी महाराष्ट्रातील न्यायाधीश देशाचे सरन्यायाधीश होतील.
जानेवारी १९५० मध्ये पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील न्या. हिरालाल कणिया पहिले सरन्यायाधीश झाले. तेव्हापासून महाराष्ट्रातील जे सरन्यायाधीश झाले त्यांत (कंसातील आकडा पदसंख्येचा) न्या. प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर (७), न्या. मोहम्मद हिदायतुल्ला (११), न्या. जयंतीलाल चिमणलाल शहा (१२), न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड (१६), न्या. मधुकर हिरालाल कणिया (२३), न्या. सॅम पिरोज भरुचा (३०) व न्या. सरोश कापडिया (३८) यांचा समावेश आहे. न्या. हिरालाल कणिया व न्या. मधुकर कणिया हे पिता-पुत्र सरन्यायाधीश होण्याचा विरळा मानही महाराष्ट्राच्याच वाट्याला आला आहे.
न्या. शरद बोबडे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश होणे हा नागपूरमधील ख्यातनाम वकिली घराण्याचा गौरव आहे. न्या. बोबडे यांचे आजोबा हे पूर्वीच्या मध्य भारताच्या नागपूर हायकोर्टाचे निष्णात वकील होते. त्यांचा पुतळा नागपूरात बसविलेला आहे. न्या. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हेही दिग्गज वकील होते व ते १९८० व १९८५ अशा दोन वेळा महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल होते. न्या. बोबडे यांचे दिवंगत थोरले बंधू विनोद बोबडे हेही सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील होते.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नात्याने न्या. बोबडे यांनी गेल्या सहा वर्षांत अनेक महत्वाचे निकाल दिले. त्यात ‘राइट ट्यू प्रायव्हसी’ हा मुलभूत हक्क ठरविणारा निकाल व आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्ट्रर आॅफ सिटिझन्स’ (एनारसी) राबविण्याचा निकाल यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.अयोध्या प्रकरणाच्या विशेष पीठावरही न्या. बोबडे आहेत.
न्यायाधीश निवडीचा अधिकार
सरन्यायाधीश या नात्याने न्या. बोबडे ‘कॉलेजियम’चे प्रमुख असतील व पुढील दीड वर्षांत देशभरातील उच्च न्यायालयांत व सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीशांच्या नियुक्त्या तसेच त्यांच्या बदल्या यात त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. या काळात त्यांच्या ‘कॉलेजियम’मध्ये न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन नरिमन, न्या. आर. भानुमती, न्या. उदय उमेश लळित व न्या. अजय खानविलकर यांचा समावेश असेल. यापैकी काही काळ ‘कॉलेजियम’मध्ये न्या. बोबडे, न्या. लळित व न्या. खानविलकर हे तीन मराठी न्यायाधीश असतील.
महत्त्वाची इतर कामगिरी
जानेवारी २०१८मध्ये न्या. रंजन गोगोई, न्या. जस्ती चेलमेश्वर, न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी त्यावेळचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरुद्ध जाहीर पत्रकार परिषद घेतल्याने सर्वोच्च न्यायालयात न भूतो असे वादळ उठले. ते वातावरण निवळवून न्यायमूर्तींमध्ये पुन्हा सौहार्द निर्माण करण्यात न्या. बोबडे यांनी पडद्यामागे महत्वाची भूमिका बजावली.
कारकीर्दीवर एक नजर
नागपूर विद्यापीठातून बी.ए. व एलएल. बी. पदव्या. १९७८ मध्ये वकिलीची सनद. त्यानंतर त्यांनी तब्बल २१ वर्षे उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून मनोनित केले गेले. १९९८मध्ये ‘सीनियर कौन्सेल’ म्हणून मान्यता. मार्च २००० मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती. १६ आॅक्टोबर २०१२ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती.
१२ एप्रिल २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती २९ आॅक्टोबर २०१९ नियोजित सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती.