नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रमणा २४ एप्रिल रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी अलीकडेच न्या. रमणा यांच्या नावाची शिफारस करून होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. यानंतर केंद्राकडे न्या. रमणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. (justice ramana will take charge of chief justice of india on April 24)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. रमणा यांच्या नियुक्ती पत्रावर मंगळवारी स्वाक्षरी केली. आता यानंतर २४ एप्रिल २०२१ रोजी न्या. रमणा सरन्यायाधीश पदाची शपथ घेऊन या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. न्या. रमणा हे देशाचे ४८ वे सरन्यायाधीश असतील. काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केंद्र सरकारने केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते.
सरन्यायाधीश शरद बोबडे होणार निवृत्त
सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर लगेचच न्या. रमणा पदभार स्वीकारणार आहेत. न्या. रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. न्या. शरद बोबडे यांच्यानंतर एन.व्ही. रमणा हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमणा यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वांत जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली जाते.
एन. व्ही. रमणा होणार नवे सरन्यायाधीश; न्या. बोबडे यांनी केली केंद्राला शिफारस
कोण आहेत एन. व्ही. रमणा
न्या. एन. व्ही. रमणा यांचे पूर्ण नाव नाथुलापती वेंकट रमणा असे असून, त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. ते ६४ वर्षांचे आहेत. १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरुवात केली. न्यायमूर्ती रमणा यांचे बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेले असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेले आहे.
दरम्यान, १८ नोव्हेंबर २०१९ ला शरद बोबडे यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. ते भारताचे ४७ वे सरन्यायाधीश ठरले होते. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळाला होता.