ट्विटरवरून 'भाजपा' हटवणाऱ्या सिंधियांनी मौन सोडले; एका वाक्यात अफवांवर बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 08:05 PM2020-06-06T20:05:18+5:302020-06-06T20:07:02+5:30
भाजपा सोडणार असल्याच्या चर्चांवर ट्विटरवरुन एका ओळीत भाष्य
भोपाळ: माजी खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटर बायोमधून भाजपाचा उल्लेख हटवल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतच मतभेद होत असल्यानं सिंधिया यांनी ट्विटरवरून भाजपाचा उल्लेख काढून टाकल्याचं बोललं जात आहे. याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानं अखेर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करून यावर भाष्य केलं.
चुकीच्या बातम्या सत्यापेक्षा वेगानं पसरतात, असं ट्विट सिंधिया यांनी केलं. या माध्यमातून त्यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. सिंधिया यांनी मार्चमध्ये काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत २२ समर्थक आमदारांनीही पक्ष सोडल्यानं राज्यातील काँग्रेस सरकार कोसळलं. २० मार्चला कमलनाथ यांचं सत्ता कोसळल्यानंतर २३ मार्चला शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Sadly, false news travels faster than the truth.
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) June 6, 2020
माझ्या ट्विटरवर बायोमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचं स्पष्टीकरण सिंधिया यांनी दिलं. 'काही माध्यमांमध्ये याबद्दल चर्चा झाली. मात्र त्यात कोणतंही तथ्य नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. भाजपामध्ये प्रवेश करतेवेळी असलेला ट्विटर बायो आणि आत्ताच बायो यामध्ये कोणताही बदल नाही. मी केवळ ट्विटरवरील माझा फोटो बदलला आहे,' असं सिंधिया यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेला सांगितलं.