भोपाळ : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सहकुटुंब बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आई माधवी राजे, पत्नी प्रियदर्शनी आणि मुलगा आर्यमन आले होते. या भेटीचा फोटो ज्योतिरादित्यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर लगेच अफवांचा बाजार तापला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपाच्या खासदारांना संबोधित करत असताना मोदी यांनी म्हटले होते की, परिवारवादाच्या विरोधात आहे. पक्षाच्या नेत्यांच्या मुलांना निवडणुकीत तिकीट न मिळण्यामागे आपणच होतो, असे ते म्हणाले. या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशच्या भाजपा नेत्यांची चिंता वाढली आहे.
दीड वर्षांनी मध्य प्रदेशच्या निवडणुका आहेत. विधानसभेच्या रिंगणात अनेक नेत्यांना त्यांची पुढची पीढी राजकारणात आणायची आहे. बुधवारी शिंदे त्यांची आई, पत्नीसोबत मुलालाही मोदींच्या भेटीला घेऊन गेले होते. आता ही भेट खासगी कारणातून झाली की राजकीय याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतू आपल्या मुलाला राजकारणात उतरविण्याची तयारी शिंदे यांनी केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
काँग्रेसला सोडून भाजपात आलेल्या शिंदे यांच्या प्रगतीचा ग्राफ खूप वेगाने वाढत आहे. ते त्यांच्या क्षेत्रात देखील सक्रीय आहेत. आसपासच्या विधानसभा, लोकसभेच्या जागा त्यांच्या प्रभावाखाली येतात. असे असले तरी शिंदे यांनी त्यांच्या मुलाला राजकारणात उतरविले नव्हते. शिंदे घराण्यात मुले-मुलींनी राजकारणात येण्याची परंपरा आहे. कारण ते तेथील राजे होते. यामुळे आर्यमनची देखील राजकारणात लवकरच एन्ट्री होऊ शकते. गेल्या वर्षभरात आर्यमन शिंदे अनेकदा लोकांमध्ये मिसळल्याचे दिसून आले आहे.