नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खरमरीत पत्र लिहून पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनाम्यांची मालिका सुरू झाली आहे. आज मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोडून काही वेळ उलटण्यापूर्वीच युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.
''लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य करून त्याची जबाबदारी मी स्वीकारत असून, मी माझ्याकडे असलेल्या पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करत आहे. माझ्याकडे हा पदभार सोपवून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,'' असे शिंदे यांनी राजीनामा देताना सांगितले.
दरम्यान, मुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस केली आहे.
काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी देवरा दिल्लीत जाऊ शकतात. हा राजीनामा संदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची माहिती हाती आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेससाठी भाजपा-शिवसेना आणि वंचित आघाडीच्या प्रभावाचा निषेध करणे हे काँग्रेससाठी एक मोठे आव्हान आहे, असे त्यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले आहे.