नवी दिल्ली : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व प्रख्यात विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचे हत्या प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले आहे. कलबुर्गी हत्येबाबत त्यांची पत्नी उमादेवी यांनी दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी होईल. ही सुनावणी पुढे ढकलण्याची महाराष्ट्र, कर्नाटक सरकारची विनंती न्यायालयाने अमान्य केली.दोन्ही राज्यांनी या खटल्यामधील आपली बाजू मांडण्याचे काम पूर्ण करावे व पुढील सुनावणीसाठी सज्ज राहावे, असा आदेश न्या. रोहिन्टन नरिमन व न्या. विनीत सरन यांच्या खंडपीठाने दिला आहे. गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणांमध्ये एक समान धागा असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उदय ललित यांच्या खंडपीठाने व्यक्त केलेच होते.विवेकाचा आवाज दडपून टाकणाऱ्या प्रवृत्तींविरोधात न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याबद्दल काही जणांनी समाधानही व्यक्त केले होते. कर्नाटक सरकारची बाजू मांडणारे अॅड. देवदत्त कामत यांनी याआधी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरूतील निवासस्थानी पत्रकार गौरी लंकेश व ३० ऑगस्ट २०१५ रोजी कलबुर्गी यांच्या झालेल्या हत्येमध्ये एक समान धागा आहे. त्यावर उत्तर देण्यासाठी सीबीआयने न्यायालयाकडे मुदत मागून घेतली होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.कडक शिक्षा करागोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गींची हत्या करणारे एकच असावेत, असा दावा उमादेवी कलबुर्गी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. या हल्लेखोरांना कडक शिक्षा सुनावण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
कलबुर्गी हत्याप्रकरण गंभीर स्वरूपाचे; सर्वोच्च न्यायालयाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 4:19 AM