नवी दिल्ली - चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर मक्कल निधी मय्यम (एमएनएम) (Makkal Needhi Maiam) पक्षाची स्थापना करणाऱ्या कमल हासन (Kamal Hassan) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र याच दरम्यान हासन यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्यांच्या कारवर हल्ला करत खिडकी खोलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हासन निवडणूक प्रचारानंतर कांचीपूरममधील एका हॉटेलमध्ये जात होते. हासन यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र या हल्ल्यात गाडीचं जास्त नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे.
कमल हासन यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती त्यांचा फॅन असल्याचं म्हणत आहे. तसेच त्यानं ज्यावेळी हल्ला केला तेव्हा तो नशेत होता. हल्ला करणाऱ्या आरोपी तरुणाला पकडण्यात आलं असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एमएनएमचे नेते ए.जी मौर्य यांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे. मौर्य यांनी ट्वीट करत कमल हासन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. हासन यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आरोपी दारुच्या नशेत होता असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी नशेत असलेल्या आरोपीला बेदम मारहाण केली आहे. यानंतर पोलिसांनी जखमी झालेल्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या कमल हासन हे तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. कमल हासन यांचा मक्क्ल नीधि मय्यम पक्ष आपल्या दोन मित्रपक्षांसह निवडणूक लढवणार आहे. मक्क्ल नीधि मय्यम 234 पैकी 154 जागांवर निवडणूक लढवणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
प्रसिद्ध अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांनी देखील कोरोनाची लस घेतली. तसेच इतरांना देखील लस घेण्याचं आवाहन केलं आहे. "पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराचं लसीकरण करुया" असं म्हणत कोरोनाची लस घेताना कमल हासन यांनी सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला लगावला आहे. "श्री रामचंद्र या रुग्णालयात मी कोरोना व्हायरसला रोखणारी लस घेतली. जे लोक स्वत:ची नाही पण इतरांची पर्वा करतात त्यांनी ही लस घेणं गरजेचं आहे. सर्वांनी कोरोनापासून स्वत:च्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी COVID 19 ची ही लस घ्यावी. आता कोरोनाला रोखणारी लस घेऊया अन् पुढच्या महिन्यात भ्रष्टाचार रोखणारी लस देऊया" असं कमल हासन यांनी म्हटलं आहे. तामिळनाडूमध्ये होणाऱ्या निवडणुकीमुळे सोशल मीडियावर कमल हासन यांच्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.