नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आपला स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतल्याच्या निर्णयाला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मध्यप्रदेशातील २८ विधानसभा निवडणुकांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला आहे.ज्येष्ठ विधिज्ञ व काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विवेक तन्खा यांनी सांगितले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विविध मुद्यांच्या आधारे आव्हान दिले असून, या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी, असा आग्रह धरण्यात येणार आहे. अधिवक्ता वरुण चोपडा यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे व न्यायालयाच्या रजिस्टीद्वारे सांगितलेल्या यातील त्रुटीही दूर केल्या आहेत.
परिणाम १० नोव्हेंबरला दिसेल -वासनिकइंदूर : प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात कमलनाथ यांचे स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द करणे दुर्दैवी आहे. मात्र, याचा परिणाम १० नोव्हेंबरला दिसेल. तीन नोव्हेंबरला २८ पोटनिवडणुकांचे मतदान होणार आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी म्हटले आहे.